महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
एम डी या अंमली पदार्थाचे सेवन केले असल्याचा आरोप करुन त्याबद्दल गुन्हा दाखल न करण्यासाठी तिघांकडे १ लाख रुपयांची मागणी करुन नंतर प्रत्येकी २० हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी मालेगाव शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकासह तिघांविरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक सुरेशकुमार ताराचंद घुसर ( रा. शिवपार्वती अपार्टमेंट, सोयगाव,मालेगाव शहर),पोलीस नाईक आत्माराम काशिनाथ पाटील (रा.मोचीवाडा कॉर्नर, कॅम्प रोड,मालेगाव शहर) आणि खासगी व्यक्ती सैय्यद राशीद सैय्यद ,रफिक उर्फ राशीद बाटा (रा. मालेगाव) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत ३० वर्षीय नागरिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,तक्रारदार यांचा भाऊ व त्यांचे दोन मित्र ३ सप्टेबर रोजी जेवण करुन घरी परत जात होते.ते एम डी या अंमली पदार्थाशी संबंधित आहेत, या कारणावरुन त्यांना मालेगाव शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आले.तेथे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई न करण्यासाठी तक्रारदार यांचा भाऊ व त्यांचे दोन मित्र यांच्यासाठी सुरुवातीला १ लाख रुपये नंतर तक्रारदार यांचा भाऊ व त्यांचा एक मित्र यांच्यासाठी पैशांची मागणी करण्यात आली.तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तडजोडीअंती तक्रारदार यांच्या भावासाठी २० हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सुनील कडासने,अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे,पोलीस उपअधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप घुगे,गायत्री जाधव तसेच पोलीस हवालदार एकनाथ बाविस्कर,मनोज पाटील, पोलीस अंमलदार संजय ठाकरे, नितीन नेटारे, संतोष गांगुडे यांनी गुन्हा दाखल केला.