बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
पुणे जिल्ह्यातील चिंचवड देवस्थान ट्रस्ट जमीन खरेदी विक्री गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचा नेता,मोरगावचा माजी सरपंच मुख्य संशयित आरोपी पोपट उर्फ कैलास तावरे याला पोलिसांनी वाचविण्याचा प्रयत्न केला व त्याच्या या गुन्ह्याशी काही संबंध नसल्याचा पोलिसांनी रिपोर्ट मा.न्यायालयात सादर केल्याने ता पोलीस अधिकाऱ्यांची तक्रार दौंड न्यायालयात गेल्याने वरिष्ठ पोलिस अधिकारी व संशयित आरोपी पोपट तावरे याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.या गोष्टींची दखल घेत न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश असल्याने यवत पोलीस ठाण्यात न्यायालयाच्या आदेशानुसार भा. द.वी कलम १६७,१९२,१९९,१९८, १९७,२००,२१७,२१८,४२०४०९,४६४,४१८,१२० (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी किरण शांताराम भोसले ( रा.जोगवडी,ता.बारामती जि.पुणे ) यांनी फिर्याद दिली आहे.
बारामतीचे तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी व सध्याचे पुण्यातील उपायुक्त नारायण शिरगावकर, पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील,यवत पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंपले व राष्ट्रवादीचा नेता मोरगावचा माजी सरपंच पोपट उर्फ कैलास तावरे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.पुणे जिल्ह्यातील चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या जमीन खरेदी विक्री प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.तक्रारदार किरण भोसले व आरती लवटे यांनी दिलेल्या तक्रारीप्रमाणे, त्यांनी पोपट उर्फ कैलास तावरे यांचे विरुद्ध व इतर लोकांचे विरुद्ध यवत पोलीस स्टेशन येथे तक्रारी दाखल केलेल्या होत्या.परंतु सदर तक्रारीची सुरुवातीला दखल घेतली गेली नाही. त्यानंतर वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर पोपट तावरे व इतर लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
परंतु त्यानंतर तपासामध्ये पोपट तावरे याला वर तीनही आरोपींनी मदत करून आरोपी विरुद्ध पुरावा नसल्याने त्याच्या विरुद्ध दोषारोप पत्र दाखल केले नाही,असा अहवाल न्यायालयात सादर केला.पोलिसांनी न्यायालयात सादर केलेला अहवाल तक्रारदार यांना मान्य नसल्याने त्या विरोधात तो नामंजूर व्हावा याकरिता तक्रारदार यांनी अर्ज केला होता.तसेच प्रथमदर्शनी या तीनही आरोपींनी पुरावा असताना देखील आरोपी पोपट तावरे याला मदत करण्याकरता जाणून-बुजून खोटा अहवाल पाठवणे तसेच फिर्यादींची फसवणूक करणे त्यांच्या कर्तव्यात फौजदारी स्वरूपाची कर्तव्य कसूर करणे या व अशा कारणास्तव न्यायालयामध्ये तक्रारदार यांनी अॅड. राजेश काटोरे व अॅड.अमीत काटे यांच्या मार्फत तक्रार दाखल केली होती.या गुन्ह्याचा अधिक तपास यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार हे करीत आहेत.