पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील भैरवनाथ विद्यालयात एका महिन्यापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून दहावीत शिकणाऱ्या मुलाने नववीत शिकणाऱ्या मुलावर शाळेतच कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.कुणाल विकास कराळे, वय.१५ वर्षे असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे.
या घटनेत कुणाल याच्या डोक्यात,हाताला गंभीर जखमा झाल्या असून त्याच्यावर मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमी कुणाल आणि इयत्ता दहावीत शिकणाऱ्या मुलासोबत किरकोळ कारणावरून वाद झाले होते. त्यावेळी शाळेतील शिक्षकांनी त्यांच्या मधील वाद मिटवला होता. मात्र, दहावीतील विद्यार्थ्याच्या मनात राग होता. बुधवारी कोयता लवपून आणला. कुणाल शाळेच्या मैदानातून जात असताना त्याने पाठिमागून कुणालवर तीन ते चार वार केले. यामध्ये कुणालच्या हाताच्या बोटांना व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. याबाबत शाळेतील शिक्षकांनी पोलिसांना माहिती दिली.
कुणाल याला तातडीने मंचर येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.घटनेची माहिती मिळताच मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांनी रुग्णालयात जाऊन घटनेची माहिती घेतली.पोलीस उपनिरीक्षक शेखर शेटे,पोलीस कर्मचारी तुकाराम मोरे तपास करीत आहेत.