बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
लोकसभेच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाने विविध मतदारसंघ हे टार्गेट केले असून,यात पवार कुटुंबीयांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघाचा देखील समावेश असून,या मतदारसंघाची जबाबदारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे सोपवली असून,मागील दोन दिवसापूर्वीच निर्मला सीतारामन यांनी बारामती लोकसभा मतदार संघाचा दौरा घेऊन भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जी संभामाची अवस्था होती ती दुर करण्याचा प्रयत्न केल्याने या दौऱ्याची मोठी चर्चा झाली होती.
अशातच बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे देखील ऍक्शन मोडवर आलेल्या असून,त्यांनी बारामती तालुक्यातील गावांचा गाव भेटी दौरा सुरू केला असून,याचा गाव भेट दौऱ्यामध्ये डोर्लेवाडीच्या कार्यक्रमामध्ये गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं आहे.यावेळी दोन गटांनी सुप्रिया सुळे यांच्यासमोरच गोंधळ घातला.बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी गावातून राज्यमार्गाचे काम सुरू आहे.या ठिकाणी दहा मीटर रुंदीकरण प्रस्तावित असून यामध्ये ग्रामस्थांमध्ये वाद असून,एका गटाचे म्हणणे असे होते की,सदरचा रस्ता सात मीटरचा करण्यात यावा.तर दुसऱ्या गटाने दहा मीटरचा रस्ता व्हावा अशी मागणी केली होती.
त्यामुळे या वादाला आणखी तोंड फुटले.सुप्रिया सुळे आज गाव भेटीच्या दौऱ्यावर आल्यानंतर यासंदर्भात एका ग्रामस्थाने त्याची अडचण सांगितली आणि पाहता पाहता अनेक जण उठून यामध्ये स्वतःची भूमिका मांडू लागले आणि त्यातून गोंधळाला सुरुवात झाली.यानंतर सुप्रिया सुळे यांनी सर्व ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्यानंतर ग्रामस्थांची समजूत घालत यातील नेमका वाद समजून घेतला.यावेळी सुप्रिया ताईंनी अजित पवार आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन दिलं.सुप्रिया सुळे यांनी आश्वासन दिल्यानंतर गावकऱ्यांनी संमती दर्शवली.