SAD DEMICE : बारामतीमधील महिला पोलिस कर्मचाऱ्याचा अवघ्या दहा दिवसांच्या प्रसूतीनंतर डेंग्यूने घेतला बळी ; पोलीस प्रशासनाने केली हळहळ व्यक्त..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

बारामती शहर पोलिस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या उमद्या पोलिस अंमलदार शितल जगताप गलांडे यांचे २० सप्टेंबर रोजी पहाटे पाच वाजता डेंग्यूने बळी घेतला. पुण्यातील केईएम रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. अवघ्या दहा दिवसांपूर्वी त्यांची प्रसुती झाली होती.पणदरे येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.प्रसूतीनंतर त्यांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांच्यावर पुण्यातील केईएम रुग्णालयात उपचार सुरु होते. सोमवारपासून त्यांची प्रकृती अधिकच चिंताजनक बनली होती.

बारामती शहर पोलीस ठाण्याच्या संपूर्ण संगणकीय प्रणालीचे कामकाज त्या पाहत होत्या. प्रसूतीच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्या पोलीस ठाण्यात दैनंदिन कामकाज पहात होत्या. पोलीस दलाचे शिस्तप्रिय व जोखमीचे मनाचा व शरीराचा कस लागणारे काम त्या अतिशय प्रसन्न मनाने करायच्या. पोलीस ठाण्यातील वातावरण कायम सौहार्दपूर्ण ठेवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता.त्यांच्या निधनाने पोलिस दलाची मोठी हानी झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. त्यांच्या मागे पती, एक मुलगी व दहा दिवसापूर्वी जन्मलेले बालक असा परिवार आहे.पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी गलांडे यांच्या निधनाबद्दल दु: ख व्यक्त केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *