पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. शरद पवार आणि नितीश कुमार यांच्या कितीही भेटी होऊ द्या.काही फरक पडत नाही. तिसरी, चौथी,पाचवी कुठलीही आघाडी केली तरी ती आघाडी त्यांना लखलाभ असो. मोदीजींचं कर्तृत्व आणि नेतृत्व खूप मोठं आहे. त्यांना १५० देशांमध्ये लोकप्रियता मिळाली आहे.मोदींना जग विश्वगुरू म्हणून बघते.अशा नेत्याची तुम्ही बरोबरी करू शकत नाहीत.
ज्यांचे दहाच्यावर खासदार निवडून येत नाहीत,ज्यांचे साठच्यावर आमदार निवडून येत नाहीत. ते दिवसा स्वप्न बघायला लागले आहेत,अशी खरमरीत टीका करतानाच शरद पवारांनी नरेंद्र मोदींच्या नादी लागू नये. मोदी हे खूप मोठे नेते आहेत, असा इशाराही चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.
चंद्रशेखर बावनकुळे हे मीडियाशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला. शरद पवार आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या भेटीवरही त्यांनी टीका केली.नितीश कुमार यांना मिळालेलं मुख्यमंत्रीपद हे भारतीय जनता पार्टीची कृपा आहे.नितीश कुमार यांनी दगाबाजी केली. इकडं उद्धव ठाकरे यांनी दगाबाजी केली.तिकडे त्यांनी केली.आम्ही दगाबाजांना त्यांची जागा दाखवून देणार, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.