पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुक पाटी येथे चार चाकी गाडी अडवून गोळीबार करत तब्बल ३ कोटी ६० लाख रुपयांची रोकड लुटल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी पहाटे अडीच वाजेच्या दरम्यान घडली.याप्रकरणी भावेश अमृत पटेल,वय.४० वर्षे ( रा.पंचरत्न बिल्डिंग,मुंबई,रा.कहोडा, ता.उंझा,जि.मेहसाना, गुजरात ) यांनी फिर्याद दिली आहे.पटेल यांच्या फिर्यादीवरून इंदापूर पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की,फिर्यादी भावेश पटेल यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,शुक्रवारी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास वरकुटे पाटी गावचच्या हद्दीत पुणे- सोलापुर राष्ट्रीय महामार्गांवर गतीरोधक आल्यानं त्यांनी चारचाकी स्कॉपीओ गाडी (टीएस ०९ ईएम ५४१७)पुण्याच्या दिशेने जात होती.त्यावेळी वरकुटे बुद्रुक गावच्या हद्दीत वरकुटे पाटी जवळच्या गतिरोधक जवळ गाडीची गती कमी झाली. त्यावेळी पायी चालत आलेल्या चार अज्ञातांनी हातातील लोखंडी टॉमी दाखवत पटेल यांना गाडी थांबवण्यास सांगितले. फिर्यादी यांनी घाबरून गाडीचा वेग वाढवला.
यावेळी अज्ञात चार अनोळखी चोरटयांनी पायी चालत येऊन हातात लोखंडी टॉमी दाखवून फिर्यादी यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. परंतु फिर्यादी यांनी गाडी तेथुन भरधाव वेगात सोलापुरकडून पुण्याकडे घेतली. यावेळी मारूती स्विप्ट गाडी व टाटा कंपनीच्या गाडीतून त्यांचा अज्ञातांनी पाठलाग केला. पटेल यांनी तरीदेखील गाडी थांबवली नाही.यानंतर लुटारांनी पटेल यांच्या गाडीवर गोळीबार करत त्यांची गाडी रस्त्यामध्ये अडवुन गाडीतील भावेशकुमार व विजयभाई यांना चौघांनी मारहाण केली आणि गाडीमधील ३ कोटी ६० लाख रूपये रोख रक्कम व १४ हजारांचे दोन तसेच १२ हजाराचा एक मोबाईल असे एकुण ३ कोटी ६० लाख २६ हजार रुपये किंमतीचा माल चोरून पळून गेले. पटेल यांच्याकडे एवढी मोठी रक्कम कुठून आणली व ते कोठे निघाले होते याचा देखील तपास पोलीस करीत आहेत.
दरम्यान या घटनास्थळी पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख,बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, सुरेशकुमार धस, गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक अशोक शेळके, भिगवणचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी भेट देऊन गुन्ह्याचा सखोल तपास सुरू केला आहे. या गुन्ह्याचे तपाससाठी पाच पोलीस पथके तयार केली आहेत.