महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
दारुच्या नशेत ११२ या पोलिसांच्या नंबरवर फोन करुन आपल्या बायकोला नंदकुमार पवार या इसमाने मारहाण केल्याचे सांगितले.त्यामुळे पोलिस लगोलग घटनास्थळी पोहोचले.मात्र,नंदकुमार पवार हा स्वत:मद्यपीच होता. मारहाणीची कुठलीही घटना घडली नव्हती. दारूच्या नशेत केलेली ही गंमत या बहाद्दराच्या चांगलीच अंगलट आली.पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला. नंदकुमार शिवाजी पवार (रा. भाडळी बुद्रुक, ता. फलटण) असे संशयिताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, नंदकुमार पवार यांनी सोमवार दि. २२ ऑगस्ट रोजी रात्री ९.३० वाजता ११२ वर फोन करुन पत्नीला मारहाण केल्याची माहिती दिली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळाला भेट देवून पाहणी केली.मात्र, तेथे तसे काही झाले नव्हते. पोलिसांनी विचारणा केली असता संशयिताने मीच ११२ वर फोन करुन तुम्हाला माझा घरापर्यंत येण्यास भाग पाडले असल्याचे सांगितले.
११२ वर फोन करुन खोटी माहिती दिल्याप्रकरणी नंदकुमार पवार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पोलीस हवालदार प्रकाश खाडे करत आहेत.दरम्यान,फलटण तालुक्यातील नागरिकांनी अशा प्रकारचे खोटे फोन ११२ ला करू नयेत. खोटे फोन केल्यास ६ महिने कारावास व १ हजार रुपये दंडाची शिक्षा होवू शकते, असे आवाहन पोनि धन्यकुमार गोडसे यांनी केले आहे.