बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथील सावकारांच्या त्रासाला कंटाळून गळफास घेत आत्महत्येची घटना घडली असताना,बारामतीत खासगी सावकाराने शहरातील एका व्यापाऱ्याला व्याजाने घेतलेल्या ४० हजार रुपयांच्या बदल्यात तब्बल १ लाख २७ हजार रुपयांची रक्कम आणि ३९ हजार रुपयांचा किराणा नेल्यानंतरही आणखी पैशाची मागणी करत त्याच्या सहकाऱ्यांसह व्यावसायिकाला शिवीगाळ करत मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून,याप्रकरणी खासगी सावकार कुंडलिक काळे,त्यांचा मुलगा अक्षय काळे (रा. निरावागज,ता.बारामती) व अन्य तिघांवर बारामती शहर पोलीस ठाण्यात भा.द.वि.कलम १४३, १४७,१४९,३२४,३२३,५०४५०६,४५१, महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ चे कलम ३९, ४५ नुसार विविध कलमांन्व्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बारामती शहरातील व्यवसायिक अभिजित पुष्पराज टाटीया,वय.३६ वर्षे यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत बारामती शहर पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार,बारामती शहरातील क्रिकेट स्टेडियमजवळ फिर्यादी अभिजित टाटीयांचा किराणा मालाचा व्यवसाय आहे.२०१८ साली त्यांना व्यवसायासाठी पैशाची गरज होती.त्यामुळे त्यानी निरावागज गावातील विजय देवकाते व त्याच गावात राहणारे अवैध सावकार कुंडलिक काळे यांच्याबरोबर त्यांची ओळख करून दिली.टाटीया यांनी काळे यांच्याकडून ४० हजार रुपये महिना पाच टक्के व्याजाने घेतले. तारणापोटी बारामती सहकारी बॅंकेचा धनादेश देण्यात आला. टाटिया हे तेव्हापासून दर महिन्याला वेळोवेळी व्याज देत होते. फिर्यादींनी या खासगी सावकाराला व्याजापोटी १ लाख २७ हजार रुपये दिले होते. याशिवाय काळे यांनी गरज वाटेल तेव्हा दुकानातून ३९ हजारांचा किराणा माल नेला होता.तरीही त्यांची पैशाची मागणी थांबली नाही.
२४ ऑगस्ट रोजी काळे यांनी टाटिया यांच्या दुकानात येत दोन महिन्याचे दहा हजार रुपये व्याज द्या अशी मागणी केली. मुद्दल, व्याज फिटले असल्याचे उत्तर टाटिया यांनी दिले.त्यावर काळे याने त्यांचा मुलगा अक्षय याला फोन करत हे लोक व्याज देत नाहीत,तु इकडे ये,असे सांगितले. अक्षय हा अन्य तिघांना घेऊन आला.त्यांनी अभिजित व त्यांचे वडील पुष्कराज यांना कुटुंबियांसमोर दुकानात मारहाण करत पैशाची मागणी केली.हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे,असल्याचे टाटीया यांनी फिर्यादीत महंटले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस कर्मचारी कल्याण खांडेकर हे करीत आहेत.