पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
पुरोगामी महाराष्ट्रातील पुण्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. पुत्रप्राप्तीसाठी मांत्रिकाच्या सांगण्यावरून सर्वांसमोर अंघोळ करायला लावली.तसेच महिलेला वेळोवेळी मारहाण करुन तिच्याकडून १ ते २ कोटी रुपये उकळल्याची धक्कादायक घटना पुणे शहरात घडली आहे.याप्रकरणी चार जणांवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पीडित महिलेने रविवारी भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.पोलिसांनी महिलेचा पती, सासरे, सासु आणि मांत्रिक यांच्यावर भा.द.वि. कलम ४९७ (अ),३२३,४२०, ४०६,५०४,३४, तसेच महाराष्ट्र नरबळी,जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
भारती विद्यापीठ पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार,सासरच्यांकडून फिर्यादी यांचे वेळोवेळी शारीरिक आणि मानसिक शोषण करण्यात आले. फिर्यादीला तिच्या आई वडिलांकडून लग्नात मिळालेले तिचे दागिने आणि फ्लॅटची कागदपत्रे परस्पर बँकेत ठेऊन त्यावर बनावट स्वाक्षरी करुन ७५ लाखाचे कर्ज घेतले.तसेच फिर्यादी यांच्या पतीने व्यावसायात भरभराट आणि घरात शांतता नांदावी म्हणून फिर्यादीसोबत अघोरी पूजा केली.
फिर्यादी महिलेच्या पती, सासू, सासरे यांनी भानामती नाहीशी व्हावी यासाठी मांत्रिकाच्या सांगण्यावरुन रायगड येथे नेऊन फिर्यादींना सर्वांसमोर नग्न होऊन अंघोळ करायला लावली.महिलेने तक्रार दिल्यानंतर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा
पुढील तपास पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर करत आहेत.अद्यापही या गुन्ह्यातील संशयित आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.