इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
इंदापूर तालुक्यातील कुरेशी गल्ली येथे कत्तलीचे उद्देशाने बांधून ठेवलेल्या नऊ जनावरांना उरुळीकांचन येथील गोरक्षकांनी इंदापूर पोलिसांच्या मदतीने जीवनदान दिले असून याप्रकरणी अज्ञात इसमावर इंदापूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ चे कलम ९ , ५ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी सरसेनापती हंबीरराव मोहिते संघटनेचे गोरक्षक अक्षय राजेंद्र कांचन,वय.२४ वर्षे ( रा.उरुळी कांचन,महादेवनगर,ता.हवेली,जि.पुणे ) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत इंदापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोरक्षक अक्षय कांचन यांना (दि.१७) ऑगस्ट रोजी गोपनीय बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, इंदापूर तालुक्यातील कुरेशी गल्लीमध्ये कत्तलीच्या उद्देशाने जनावरे बांधलेली असून,त्याच्या पाठीमागे असलेल्या खोलीत जनावरांची कत्तल होऊन त्याचे गोमांस पुणे परिसरात पाठवले जाते.अशी बातमी मिळाल्यानंतर कांचन यांनी त्यांचे सहकारी गोरक्षक ऋषिकेश कामठे यांच्यासह ही बाब बारामती उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांना कळवली. इंगळे यांनी तात्काळ वालचंद नगर पोलीस ठाण्यातील कर्मचारी यांना याठिकाणी रेड करण्याबाबत सूचना केल्या.
वालचंदनगर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी त्याठिकाणी छापा मारला असता,कुरेशी गल्ली येथे कत्तलीच्या उद्देशाने देशी गाई व बैल अशी नऊ जनावरे बांधून ठेवलेली मिळून आली.व शेजारील बंद खोलीत गाई व वासरे यांना कत्तल करण्याचे साहित्य मिळून आले.कुरेशी गल्ली येथे ८ देशी गायी व १ बैल अशी अंदाजे १,८०,००० रुपये किंमतीची जनावरे मिळून आल्याने अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे फिर्यादीने फिर्यादीत महंटले आहे.या गुन्ह्याचा अधिक तपास इंदापूर पोलीस करीत आहेत.