पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
मुळ बिटकॉईनच्या गुंतवणुकीवर त्याच्यापेक्षा अधिक बिटकॉईनचा परतावा मिळाला असल्याचे दर्शवून ते बिटकॉईन क्रिप्टो करन्सीच्या प्रॉझी स्किममध्ये गुंतवणूक करायला भाग पाडून एका वकिलाला तब्बल २२० बिटकॉईनला किमान ४२ कोटी रुपयांना गंडा घालण्याचा प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी कोंढवा बुद्रुक येथील एका वकिलाने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यानुसार पोलिसांनी बिटकनेक्ट कंपनीचे मालक सतीश कुंभाणी एटीसीसी कॉईनचे मालक सतिश जेवरिया,दिखादो कॉईन रणजित सक्सेना,दिव्येश दर्जी, विरेश चरंतीमठ, राकेश दिव्येश दर्जी,मेहुल पाचीगर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,हा प्रकार जानेवारी २०१६ ते जुन २०२१ दरम्यान घडला आहे आरोपी यांनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन त्यांना एटीसीसी कॉईन, दिखादो कॉईन व इतर खोट्या क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीतून मोठ्या प्रमाणावर परतावा मिळतो,अशी खोटी आमिषे दाखवून वेगवेगळ्या प्रॉझी स्किममध्ये बिटकॉईनमध्ये गुंतवणुक करण्यास भाग पाडले.त्यानंतर त्यांच्या मुळ गुंतवणुक केलेल्या ५४ बिटकॉईनवर परतावा म्हणून तब्बल १६६ बिटकॉईन मिळाल्याचे त्यांना भासविले.
त्यानंतर दिव्येश दर्जी आणि विरेश चरंतीमठ यांच्या सांगण्यावरुन पुन्हा वेगवेगळ्या क्रिप्टो करन्सीच्या प्रॉझी स्किममध्ये २२० बिटकॉईन गुंतवणुक करण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यांच्या खात्यावर एकही बिटकॉईन दिसून येत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली.सध्या एका बिटकॉईनचा दर १९ लाख ३६ हजार ९६४ रुपये इतका आहे.त्याअर्थी त्यांच्या मुळ ५४ बिटकॉईनचे एकूण १० कोटी ४५ लाख रुपये इतकी सध्या किंमत आहे.त्यांनी आपली २२० बिटकॉईन म्हणजे ४२ कोटी ६१ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.