Harshwardhan patil Speak : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा- हर्षवर्धन पाटील


इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

लोकशाहीर,साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी आयुष्यभर विविध क्षेत्रात केलेले कार्य महान आहे. आजच्या समाजाला त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी आहे. या कार्याची केंद्र सरकारने दखल घेऊन देशातील सर्वोच्च अशा भारतरत्न पुरस्काराने अण्णाभाऊ साठे यांना सन्मानित करण्यात यावे,अशी मागणी भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केली.बावडा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील रविवारी (दि.१४) बोलत होते.यावेळी पाटील यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या अर्ध पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

ते पुढे म्हणाले,राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि.१ ऑगस्ट रोजी मुंबईत अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे या संदर्भात राज्य शासन हे केंद्र सरकारकडे शिफारस करेल असे जाहीर केले आहे. अण्णाभाऊंनी कष्ट करणारा वर्ग,उपेक्षित वर्ग,मजूर वर्ग यांच्या विकासासाठी संपूर्ण आयुष्य वेचले. संयुक्त महाराष्ट्र चळवळ,गोवा मुक्ती संग्रामात त्यांचा सक्रिय सहभाग होता.जन्मगावापासून मुंबईपर्यंतची पायी यात्रा, अनेक कादंबऱ्या,पोवाडे,समाज प्रबोधन करण्याचे त्यांचे कार्य अद्वितीय आहे.त्यांची फकीरा कादंबरी घराघरात पोहचली आहे.रशियामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य पोवाड्याच्या माध्यमातून त्यांनी अजरामर केले आहे.

तसेच रशियन भाषेमध्ये देखील शिवाजी महाराजांचा पोवाडा पुस्तकरूपी लिहिला गेला,असे गौरवोद्गार हर्षवर्धन पाटील यांनी काढले.अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी आजपर्यंत आपण मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे.याठिकाणी अण्णाभाऊंच्या अर्धपुतळ्याचे लवकरच अनावरण केले जाईल, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.या कार्यक्रमात भीमराव आवारे,शरद गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास निरा भिमा साखर कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील,सरपंच किरण पाटील,सहकार महर्षी मोहिते पाटील कारखान्याचे संचालक महादेव घाडगे या मान्यवरांसह गावातील पदाधिकारी,कार्यकर्ते,मातंग समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी हर्षवर्धन पाटील यांची रथातून मिरवणूक काढण्यात आली.सूत्रसंचालन कालिदास आवाड तर आभार चिंतामणी गायकवाड यांनी मानले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *