पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी पाच हजार रुपयाची लाच घेताना पोलीस हवालदार विजय एकनाथ शिंदे यांना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई शनिवारी करण्यात आली असून रविवारी कोथरुड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईमुळे पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.याप्रकरणी २६ वर्षीय व्यक्तीने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
त्यानुसार शुक्रवारी पडताळणी करण्यात आली.तर रविवारी सापळा रचून पोलीस हवालदार विजय शिंदे वय.४८ वर्षे यांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. तक्रारदार व त्यांच्या मित्रावर कोथरुड पोलीस ठाण्यात चॅप्टर केस दाखल आहे. यामध्ये हजर करुन घेण्यासाठी व जामीन मिळण्यास मदत करण्यासाठी विजय शिंदे यांनी पाच हजार रुपये लाचेची मागणी केली.तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबीकडे तक्रार केली.पथकाने शुक्रवारी पंचासमक्ष पडताळणी केली असता शिंदे यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
शनिवारी सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना शिंदे यांना रंगेहात पकडण्यात आले.त्यांच्यावर कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन विशेष न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १६ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.पुढील तपास पुणे एसीबीचे पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर करत आहेत.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे,अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पथकाने केली.