बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
सन २०२० साली संपूर्ण जगभर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना ग्रामप्रशासन मात्र सत्तेच्या मस्तीत मश्गुल होते.गावच्या गायरान क्षेत्रात अवैध उत्खनन झाले होते.तेथे स्थानिक नागरिकांनी प्रखर विरोध दर्शवूनही ग्रामपंचायत प्रशासनाने स्वमर्जीने नागरी लोकवस्ती शेजारी मैला मिश्रित सांडपाणी सोडले.परिणामी प्रत्येक पावसाळ्यात लोकवस्तीत साथीच्या आजारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.अवैध उत्खननामध्ये सोडलेल्या सांड पाण्यात पडून आज अखेरीस दोन निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे सोबतच पिण्याच्या पाण्याचे भूजल स्त्रोतही खराब झाले आहेत. आज स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना या घटनेच्या दोन वर्ष पूर्ती पर नागरिक मात्र आपल्या मूलभूत हक्कांच्या मागण्यांसाठी पंचायत समिती बारामती येथे आमरण उपोषणास बसण्याच्या पवित्र्यात आहेत.
गावात नागरी लोकवस्ती पासून अवघ्या ४०० फुट अंतरावर अवैध उत्खनन झाले होते. त्याच अवैध उत्खननामध्ये ग्रामप्रशासनाकडून मैलामिश्रित सांडपाणी सोडण्याचे योजिले होते. जुलै २०२० मध्ये नागरिकांचा विरोध असतानाही हे काम पूर्ण करण्यात आले. परिणामी सांडपाण्याच्या भल्या मोठ्या खड्ड्यामध्ये पडून आज अखेरीस दोन निष्पाप नागरिकांचा मृत्यू तर झालाच आहे.सोबतच खड्ड्या शेजारील परिसरातील पिण्याच्या पाण्याचे भूजलस्त्रोत खराब झाले आहेत. मागील दोन वर्षांपासून पावसाळ्याच्या दिवसांमध्ये त्या डबक्यामध्ये पावसाचे पाणी साठल्याने मच्छरांची पैदास मोठ्या प्रमाणात वाढते.त्यामुळे स्थानिक नागरिकांना साथीच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.
तलाठी व मंडल अधिकारी बारामती यांनी अवैध उत्खनन ठिकाणी स्वतः भेट देऊन अवैध उत्खनन झालेल्या ठिकाणांचे मोजमाप करत किमान १६५ ब्रास गौण खनिजाची चोरी झाल्याचा अहवाल तालुक्याच्या महसूल प्रशासनास सादर केला आहे.मात्र या घटनेला आज एक वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊनही कोणतीच कारवाई होताना दिसत नाही. तसेच स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्राने ग्राम प्रशासनास मैला मिश्रित सांडपाणी वाहते ठेवण्यासाठी व त्याची नागरी लोकवस्ती पासून दूरवर कायमस्वरूपी निचरा व्यवस्था करण्यासाठी पत्रव्यवहार करूनही त्या सूचनांचीही दखल घेतली जात नाही.
हीच बाब गावातील सुशिक्षित, तरुण, सामाजिक कार्यकर्त्यांनी तालुका आणि जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत दोन वर्ष अखंड पाठपुरावा सुरू ठेवला आहे.याप्रकरणी पुणे जिल्हाधिकारी आणि पुणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत विभाग) यांनी आदेश देऊनही आज अखेरीस तालुका प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळे प्रशासकीय कारवाईचे आदेश फक्त कागदावर लिहिण्या पुरतेच मर्यादित राहिल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
आपला देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना सर्वसामान्यांच्या मागण्यांना प्रशासनाकडून तिलांजली मिळत आहे त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते योगेश नाळे आणि इतर यांनी शासकीय अधिकाऱ्यांच्या पंचनाम्याप्रमाणे अवैध्य उत्खननातून १६५ ब्रास मुरमाची चोरी करणाऱ्या संबंधितांवर शासकीय नियमाप्रमाणे कारवाई व्हावी.नागरी लोकवस्ती शेजारी मैलामिश्रीत सांडपाणी सोडून शासनाच्या साथ रोग प्रतिबंधक कायदा १८९७/१ आपत्ती व्यवस्थापन अधिनियम १९५९ चा नियम ५३,५४ भंग करणाऱ्यांवर कारवाई केली जावी.
तसेच मैलामिश्रित सांडपाण्याच्या खड्ड्यात पडून मृत्युमुखी पडलेल्या दोन निष्पाप नागरिकांच्या मृत्यूप्रकरणी संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा. या प्रमुख तीन मागण्यांसाठी १५ ऑगस्ट २०२२ पासून आमरण उपोषण करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते योगेश नाळे यांनी सांगितले.