मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बँकांकडून देण्यात आलेल्या कर्जाची वसुली करताना वसुली एजंट्सकडून अनेकदा कर्जदारांना त्रास दिला जातोय, अपशब्द वापरले जातात. कर्जवसुलीसाठी प्रसंगी त्यांना धमकीही दिली जाते. रिझर्व्ह बँकेने या गोष्टींची आता दखल घेत कर्ज वसुली करणाऱ्या बँकांसाठी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार कर्जाची वसुली करणाऱ्यांना आता धमकावता येणार नाही,किंवा अवेळी कॉल करुन त्यांना त्रास देता येणार नाही.कर्जांची वसुली करताना बँकांकडून काही रिकव्हरी एजंट्सची नियुक्ती करण्यात येते, त्यांच्याकरवी वसुली केली जाते. पण ही वसुली करताना अनेकदा कर्जदारांना धमकावलं जात असल्याच्या तक्रारी आरबीआयकडे या आधीच आल्या होत्या.
त्यावर आरबीआयने आधीही काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. आताही शेड्युल्ड बँका, नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या आणि इतर बँकांसाठी कर्ज वसुलीसंदर्भात काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.यामध्ये बँक रिकव्हरी एजंट्सनी कर्ज वसुलीची कामे करताना त्यांच्या कर्जदारांना धमकावू नये किंवा त्रास देऊ नये.तसेच कर्जवसुलीसाठी अवेळी फोनवर कॉल करू नये. रिझर्व्ह बँकेने या आधीही अशा सूचना दिल्या आहेत.तसेच वसुलीच्या उद्देशाने कर्जदारांना फोनवर कॉल करण्यासंबंधी वेळेची मर्यादा देण्यात आली आहे.
या वेळेच्या मर्यादेमध्येच बँकांनी कर्जदारांशी संपर्क करावा. रिकव्हरी एजंट्सद्वारे अवलंबलेल्या चुकीच्या पद्धतींच्या वाढत्या घटनांसह काही अलिकडील काही घडामोडी लक्षात घेऊन,भारतीय रिझर्व्ह बँकेने मार्गदर्शक तत्त्वांची व्याप्ती वाढवली आहे. थकीत कर्जाच्या वसुलीसाठी कर्जदारांना फोनवर कॉल करण्याचे तास मर्यादित करून रिकव्हरी एजंट्साठी काही अतिरिक्त सूचना जारी केल्या आहेत. या सूचना सर्व व्यावसायिक बँका (प्रादेशिक ग्रामीण बँकांसह), सहकारी बँका, बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या असेट्स रिकन्स्ट्रक्शन कंपन्या आणि अखिल भारतीय वित्तीय संस्थांना लागू होतील.या बाबतच्या सूचना आजपासून लागू होतील असंही रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केलं आहे.