पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
क्लिष्ट व अतिशय गंभीर गुन्हयांचा तपास उत्कृष्टरित्या करणाऱ्या तपासी अधिकारी यांना गृह विभाग भारत सरकारकडुन “केंद्रीय गृहमंत्री पदक ” दरवर्षी प्रदान केले जाते. याकरीता महाराष्ट्र पोलीस दलास दरवर्षी एकुण ११ पदके प्रदान केली जातात. पुणे ग्रामीण पोलीस दलाकडुन क्लिष्ट व अतिशय गंभीर गुन्हयांचा उत्कृष्ट तपास करणाऱ्या चार तपासी अधिकाऱ्यांच्या नावाचा प्रस्ताव केंद्र शासनास पाठविण्यात आला होता,त्यापैकी तीन तपासी अधिकाऱ्यांना उत्कृष्ट तपासा करीता गृह विभाग भारत सरकारकडुन “केंद्रीय गृहमंत्री पदक” सन २०२२ करीता आज ( दि.१२ ) रोजी जाहिर झाले आहे.यामध्ये पोलीस निरीक्षक दिलीप पवार,पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत व सहा.पोलीस निरीक्षक मनोज पवार यांचा समावेश आहे.
पोलीस निरीक्षक दिलीप पवार हे लोणावळा शहर येथे प्रभारी अधिकारी असतांना लोणावळा शहर दाखल असलेल्या जबरी दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपींना
मध्यप्रदेश मधुन अटक करण्यात आली होती.या गुन्हयाच्या अनुषंगाने तपासा दरम्यान वरीष्ठ अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली पवार व त्यांचे पथकाने गुन्हा घडल्यापासुन अहोरात्र अथक परिश्रम करून दहा दिवसाच्या आत गुन्हयाची उकल केली.यावेळी पवार व त्यांचे पथकाने तपासा दरम्यान तब्बल १५ आरोपींना अटक करून गुन्हयात गेलेला एकुण ३०,५२,२०० रूपये किंमतीचा रोख रक्कम व मुद्देमाल हस्तगत केला.
पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत हे शिरूर येथे प्रभारी असताना शिरूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हयामध्ये आरोपींनी बॅक ऑफ महाराष्ट्र,पिंपरखेड ता. शिरूर या ठिकाणी बँकेचे कर्मचारी व ग्राहकांना पिस्तुलाचा धाक दाखवत तब्बल एकुण ८२४ तोळे साने चांदीचे दागिने व रोख रक्कम ३२,५२,५६० / – रूपये असा ऐवज लुटुन नेला होता.हा गुन्हा उघड करण्याच्या दृष्टीने पुणे ग्रामीण पोलीस दलासमोर आव्हान होते.या गुन्हयाचा शिरूर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखा यांनी समांतर तपास करून या गुन्हयामध्ये एकुण २,३६, ४२, ९६० / – रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या.या गुन्हयाच्या तपासा दरम्यान त्यांनी व त्यांचे सोबतच्या पथकाने अहोरात्र अथक परिश्रम करून गुन्हा उघडकीस आणला आहे.
सहा.पोलीस निरीक्षक मनोज पवार हे वेल्हा येथे प्रभारी अधिकारी असतांना कातकरी समाजाची एक लहान मुलगी हरविल्याबाबत तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही मुलगी मयत स्थितीत मिळुन आली होती. या मुलीच्या शवविच्छेदन अहवालात डॉक्टरांनी तिचेवर लैंगिक अत्याचार होवुन ती मयत झालेबाबत अभिप्राय दिला होता. त्यावरून सदर गुन्हयास पाक्सो कायद्याअंतर्गत वाढीव कलम लावण्यात आले होते.हा गुन्हा अतिशय गंभीर स्वरूपाचा असल्याने पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पवार व त्यांच्या पथकाने अथक परीश्रम करून सी.सी.टी.व्ही फुटेज व साक्षीदार यांचेकडुन मिळालेल्या माहिती नुसार आरोपीस ४८ तासात जेरबंद केले होते.
हा खटला पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख,यांच्या विनंती नुसार जलदगती न्यायालयात चालविला गेला या गुन्हयात आरोपीस न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनाविली आहे.अशा या क्लिष्ट व अतिशय गंभीर गुन्हयांचा तपास करतांना पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक पुणे मितेश घट्टे,अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग मिलिंद मोहिते व उपविगीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.गृह विभाग भारत सरकारकडुन उत्कृष्ट तपासाकरीता “केंद्रीय गृहमंत्री पदक” सन २०२२ करीता जाहीर झालेले पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत व सहा पोलीस निरीक्षक मनोज पवार यांचे विशेष अभिनंदन केले आहे.