बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून पंचायत समिती पुरंदर आणि तहसील कार्यालय पुरंदर यांच्या संयुक्त विद्यमाने पुरंदर तालुक्यात ‘घरोघरी तिरंगा’ अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पुर्ण होत असल्याच्या पार्श्वभुमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहव्यात यासाठी १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.या उपक्रमात पुरंदर तालुक्यात ग्रामपंचायत स्तरावर ३० हजार राष्ट्रध्वजाची उपलब्धता करून देण्यात आली आहे.
गावागावात ७५ वर्षे पूर्ण झालेल्या जेष्ठ नागरीकांच्या हस्ते फळ झाडे लागवड करण्यासाठी वाटप करण्यात आले. गट निहाय शेतकऱ्यांचे मेळावे घेण्यात आलेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत घरोघरी राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी पंचायत समिती मार्फत मोबाईल व्हॅन, फ्लेक्सद्वारे गावपातळीवर जनजागृती करण्यात येत आहे.महिला व बालकल्याण विभागातर्फे तर्फे बाल गोपाळ पंगत, किशोरी मेळावा, महिला मेळाव्याचे आयोजन सुरु आहे. शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांची प्रभात फेरी, वकृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व निबंध स्पर्धा यांचे शालेय स्तरावर आयोजन करण्यात येत आहे. आरोग्य विभागाकडून प्रत्येक उपकेंद्रात आरोग्य तपासणी शिबीर आयोजीत करण्यात येत आहे.
पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण मोहीम, महाराष्ट्र राज्य ग्रामिण जीवन उन्नौती अभियानांतर्गत महिला सक्षमीकरण व महिला बचत गटाचे मेळावे आयोजीत करण्यात आले. तालुक्यात अमृत घरकुल योजनेअंतर्गत १ जुलै ते १५ ऑगस्ट पर्यंत घरकुले पुर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अमृत सरोवर अंतर्गत दिवे, माळशिरस, पिसर्वे, या ठिकाणी सरोवरावर ध्वज उभारणे, वृक्षलागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती गट विकास अधिकारी अमर माने यांनी दिली आहे.शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार ‘घरोघरी तिरंगा’ हा उपक्रम १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत नागरिकांनी आपापल्या घरावर राष्ट्रध्वज उस्फुर्तपणे फडकवावा, असे आवाहन गट विकास अधिकारी अमर माने यांनी केले आहे.