बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
येणाऱ्या १५ ऑगस्ट २०२२ रोजी आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होणार आहेत आणि त्याचबरोबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३६ साली काढलेल्या स्वतंत्र मजूर पक्षाला ८६ वर्षे पूर्ण होणार आहेत.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाचा कार्यकाल जर आपण पाहीला तर आपल्याला असं लक्षात येत की त्याचं कर्तृत्व हे खूप व्यापक होतं. उदाहरणा खातर सांगायचं झालं तर एका पायलीमध्ये जितके तांदळाचे दाणे बसतील त्या तांदळांच्या दाण्यांपैकी एक दाणा म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १५ ऑगस्ट १९३६ रोजी काढलेला स्वतंत्र मजूर पक्ष.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय योगदानाची चर्चा करताना ती दोन पातळ्यांवर करावी लागते. एका पातळीवर त्यांनी अस्पृश्यांच्या हक्कांसाठी केलेले राजकारण आणि दुसऱ्या पातळीवर भारतीयांसाठी आणि अंतिमतः मनुष्यजातीच्या मुक्तीसाठी केलेले योगदान समजावून घ्यावे लागते.बाबासाहेबांचे महिला, इतर मागासवर्गीय,कामगार,शेतकरी आदींच्या मुक्तीचे राजकारण तुलनेने दुर्लक्षित राहते. ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत.त्यांनी भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच अस्पृश्यतेचा प्रश्न राजकीय पातळीवर नेला आणि त्यांच्यासाठी राजकीय हक्कांची मागणी केली. संविधानात ते मिळवूनही दिले.सामाजिक न्यायासाठी प्रतिनिधित्व मिळावे यासाठी शिक्षण,सरकारी नोकऱ्या आणि पंचायत राज्य ते संसद येथे राजकीय आरक्षण मिळवून दिले.
त्यामुळे अस्पृश्यांचा मुक्तिदाता हा त्यांचा पैलू अनेकदा प्रखरपणे मांडला जातो,ठळकपणे पुढे येतो.१९२४ ते १९३५ च्या दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी चळवळ चालविली ती बहिष्कृत हितकारिणी सभेच्या मार्फत. १९३० ते १९३५ च्या काळात काँग्रेस, हिंदु महासभा वगैरे मातब्बर राजकीय पक्षांनी साऱ्या पुढारीपणाचे भारताच्या नेतृत्व आपल्याकडे घेण्यासाठी जो अश्वमेध सुरु केला.त्यात या पक्षांच्या अश्वांचा लगाम बाबासाहेबांनी पकडून ते अश्व
अस्पृश्यांच्या ते राजकीय क्षेत्रातून दूर उभे केले व अस्पृश्यांचे स्वतंत्र राजकीय अस्तित्व या पक्षांच्या अश्वमेधाच्या यज्ञात पडू दिले नाही लंडन येथील गोलमेज परिषदेत आणि पुणे कराराच्या वेळी प्राणपणाने लढा देऊन बाबासाहेबांनी अस्पृश्यांचे स्वतंत्र राजकीय अस्तित्व व हक्क मिळवले.या राजकीय हक्कांचा उपयोग अस्पृश्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी करण्यासाठी बाबासाहेबांनी विस्तृत भूमिका तयार करण्याचे ठरविले. अस्पृश्यांसाठी राजकीय पक्ष स्थापावा व त्यातर्फे अस्पृश्यांना जे १९३५ च्या कायद्याने राजकीय हक्क दिलेले आहेत त्यांचा भरपूर फायदा घेऊन अस्पृश्यांत जादा राजकीय आकांक्षा उत्पन्न कराव्यात,असे विचार निवडणुका जसजशा जवळ आल्या तसतसे बाबासाहेबांच्या मनात घोळू लागले.
या बाबतीत विचार विनिमय करत असताना त्यांना असे वाटू लागले की १९३५ च्या कायद्यान्वये जे राजकीय हक्क मिळालेत ते तर त्यांना मिळवता येतीलच,पण स्पृश्य लोकांकरिता जे राजकीय हक्क मिळालेत त्यांना मताचा पाठिंबा देऊन इतर उमेदवारही आपण निवडून देऊ शकू.हे विचार मनात येताच बाबासाहेबांनी राजकीय पक्ष जातीच्या पायावर न आतापर्यंत उभारण्याचे ठरविले अस्पृश्यांचा लढा मर्यादित स्वरूपाचा होता. त्याला राष्ट्रीय स्वरूप प्राप्त व्हावे म्हणून बाबासाहेबांनी कामगार शेतकरी यांच्या लढ्यांशी अस्पृश्यांचा लढा सलग्न करण्याचे ठरविले पक्षाची घटना आणि त्याचे ध्येय व कार्यक्रम इंग्लंडमधील ब्रिटीश पार्टीचा आदर्श पुढे ठेऊन लेबर पार्टीचा आदर्श पुढे ठेऊन ठरविण्यात आले.
गोलमेज परिषदेच्या निमित्ताने बाबासाहेबांना लंडनला पाच वेळा जावे लागले व तेथे प्रत्येक वेळेला काही महिने राहावे लागले.तेव्हा त्यांना मजूर पक्षाचे पुढारी, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी परिचय करून घेण्याची व चर्चा करण्याची संधी मिळालेली होती. त्यावेळी बाबासाहेबांनी ब्रिटीश मजूर पक्षाची घटना, कार्यक्रम वगैरे संबंधीचे अभिलेख अभ्यासलेले होते. त्यातूनच त्यांनी आपल्या पक्षाची घटना,कार्यक्रम व ध्येय ही ठरविली आणि बाबासाहेबांनी नवीन पक्षाचे ‘Independent Labour Party’स्वतंत्र मजूर पक्ष असे नामाभिमान केले.पक्षाचा जाहीरनामा व कार्यक्रम तयार करण्यासाठी बाबासाहेब बैठक मारून बसले व तो त्यांनी तीन-चार दिवसात तयार केला.पक्षाची घटना व ध्येय ठरविताना त्यांनी इंग्लंडच्या लेबर पार्टीला नजरेसमोर ठेवलेले होते. इंग्लंडची लेबर पार्टी मंगळवार २७ फेब्रुवारी १९०० रोजी मेमोरियल हॉल, फॉरीड्न स्ट्रीट,लंडन येथील ५,६८,००० कामगारांच्या ६५ ट्रेड युनियन्सच्या १२९ प्रतिनिधींच्या सभेत निर्माण करण्यात आली होती.
बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्ष या नव्या पक्षाची घटना, ध्येय व कार्यक्रम याबद्दलचा वृत्तांत टाईम्स ऑफ इंडियाच्या १५ ऑगस्ट १९३६ (शनिवार) या अंकात प्रसिद्ध केला.तो पुस्तकाच्या रूपाने १९३७ साली श्री लक्ष्मीनारायण प्रेस, मुंबई येथे छापून प्रसिद्ध केला गेला. अस्पृश्यवर्गाला हजारो वर्षे विशेषाधिकार प्राप्त झालेल्या वरिष्ठ वर्गांनी दाबून टाकले होते. सन १९३७ च्या पहिल्या निवडणुकीत मुंबई या इलाख्यात या पक्षाने निवडणूक लढविली. काँग्रेस समोर एकमेव विरोधी पक्ष म्हणून हा पक्ष पुढे आला. मुंबई प्रांतात स्वतंत्र मजूर पक्षातर्फे १८ उमेदवार बाबासाहेबांनी उभे केले होते. या उभे केलेल्या उमेदवारांना निवडून द्या,अशी विनंतीपत्रे बाबासाहेबांनी २३ जानेवारी १९३७ (पा.८) व ३० जानेवारी १९३७ (पा.१) च्या ‘जनता’ पत्रात प्रसिद्ध केली होती. या १८ उमेदवारांपैकी १३ उमेदवार हे राखीव जागेवर तर २ उमेदवार हे खुल्या जागेवरून विजयी झाले होते. विजयी उमेदवारांची नावे अशी होती – मुंबई मधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर,पुणे पश्चिम- आर.आर. भोळे, सातारा उत्तर-खंडेराव सावंत, पुणे पूर्व- विनायकराव
गडकरी, ठाणे दक्षिण- रामकृष्ण भातनकर,रत्नागिरी उत्तर- अनंतराव चित्रे,गंगाराम घाटगे, रत्नागिरी दक्षिण- शामराव परुळेकर,अहमदनगर दक्षिण- प्रभाकर रोहम सोलापूर उत्तर जिवाप्पा ऐदाळे,खानदेश पूर्व- दौलतराव जाधव,नाशिक पश्चिम- भाऊराव गायकवाड, बेळगाव उत्तर- बळवंत वराळे, ठाणे जिल्हा उत्तर-दत्तात्रय राऊत आणि वऱ्हाडातून दत्तात्रय राऊत आणि वऱ्हाडातून पंजाबराव देशमुख निवडून आले.
स्वतंत्र मजूर पक्षाच्या वतीने कायदे मंडळाच्या निवडणुकीत यशस्वी झालेल्या उमेदवारांचे अभिनंदन करण्यासाठी पक्षाच्या वतीने रविवार ता. ३० मे १९३७ रोजी संध्याकाळी परळ येथील कामगार मैदान पोयबावडी येथे डॉ.सोळंकी यांच्या अध्यक्षतेखाली
एक सभा भरविण्यात आली होती,त्या सभेत भाषण करताना बाबासाहेब म्हणाले की, “आज राजकारणाचा डाव बंद पडला असला तरी ज्या दिवशी हा डाव नव्याने सुरु होईल,त्यावेळेस जरूर असणारी तयारी आमच्या जवळ मजबूत आहे. आम्हांला जे कायदे घडवून आणायचे आहेत त्यांचे बार आमच्याजवळ भरून तयार आहेत.टार्गेट लावण्याची खोटी की,आम्ही एकदम आमचे पिस्तुल झाडणार आहोत कायदेमंडळापुढे मांडावयाच्या कायद्याचे मसुदे आमच्या खिशात तयार आहेत. आम्ही फक्त खेळ सुरु होण्याचीच वाट पाहत आहोत.” मुंबई असेंबलीमध्ये स्वतंत्र मजूर पक्ष सशक्तपणे विधी सभेचे काम करीत होता.खोती पद्धती नष्ट करणारे बिल,कुटुंब नियोजन बिल यासारखी बिले पक्षाकडून मांडली गेली. शेतकऱ्यांचा खोती करणाऱ्यांचा भव्य मोर्चा बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली १० जानेवारी १९३८ साली मुंबई मध्ये काढण्यात आला. १९३० पासून सुरु असलेल्या कष्टकऱ्यांच्या आंदोलनास स्वतंत्र मजूर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कष्टकऱ्यांना खोतांच्या अत्याचाराविरोधात भूमिका घेऊन शेतकऱ्यांना संरक्षण दिले.
चिपळूण, पथरे, चरी, नागोठणे, रेपाली, भेंडखाळ, काळवण, माणगाव, चिखलप इत्यादी ठिकाणी शेतकऱ्यांच्या परिषदा झाल्या. सोमवार ता. १६ मे १९३८ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे चिपळूण मुक्कामी अत्यंत स्फूर्तीदायक भाषण झाले बाबासाहेबांच्या भाषणापूर्वी श्रीमती रत्नाबाई यांचे भाषण झाले.त्या म्हणाल्या, आमच्यावर खोतांचा भयंकर जुलूम होत असून,आता तो असह्य झाला आहे. तुम्ही आता येथे सभा घेऊन खेड, दापोली येथे जाल व तेथून मुंबईस परत फिराल.आम्ही मात्र येथे कायमचेच राहणार आहोत.तुम्ही गेल्यावर आमचा छळ कायम राहील. भाषणानंतर काँग्रेस पक्षीयांकडून कुत्सित अर्थाने टाळ्या वाजविल्या गेल्या.उत्तर देताना बाबासाहेब म्हणाले, “आताच रत्नाबाईंच्या भाषणानंतर काही गृहस्थांनी टवाळी करण्याच्या उद्देशाने टाळ्या वाजविल्या. त्यांच्या टाळ्यांचा अर्थ मी समजतो— काही खोत कुळास म्हणतात की, ‘तुझा आंबेडकर काय करतो ते पाहून घेईन’ हे खोत त्यांची व माझी लायकी पारखे समजतात काय ? कोणताही खोत माझ्यापुढे आल्यास बुद्धीने मी सहजासहजी त्याचा पाडाव करीन. ते माझी व त्यांची तुलना करीत असल्यास मी म्हणेन की कोठे मी हिमालय पर्वत व कोठे हा मुतखडा ! मी श्रीमंत नसलो तरी माझे दृष्टीने तुमचे हितास आवश्यक वाटते ते मी करीत आलो आहे आणि करीत राहणार.
आज कोठेही जा जज्ज,मामलेदार,मुनसफ,कलेक्टर हे सर्व पांढरपेशा वर्गाचे आहेत. आज तुमची संख्या शेकडा ८० पेक्षा जास्त असताना सरकारी नोकरीत तुमचे इतके थोडे लोक असावेत हे कशाचे निदर्शक आहे ? मला तुमच्यापैकी प्राईम मिनिस्टर झालेला पहावयाचे आहे. मला या मुठभर भटजी शेठ्जीचे राज्य नको असून तुम्हा ८०% लोकांचे राज्य हवे आहे.बाबासाहेबांनी पुढे हीच खोती पद्धत म्हणजेच एक प्रकारची वेठबिगारी भारताच्या संविधानामध्ये ‘कलम २३’अन्वये कायदा करून नष्ट केली.बाबासाहेबांनी इतक सगळं करून देखील आंबेडकरवादी जनसमूह त्यांच्या आज लक्षावधींच्या संख्येने अभिवादनाला पुढे येतो, मात्र मध्यमवर्गीय,पांढरपेशे, बुद्धीजीवी आणि इतर मागास जातींचे लोक बाबासाहेबांच नाव जरी ऐकलं तर नाक मुरडतात.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र मजूर पक्ष म्हणजे भारतात लोकशाही समाजवादी जीवनमूल्ये प्रस्थापित करण्याकरिता व समाजवादी
समाजरचना निर्माण करण्याकरिता सामाजिक व आर्थिक दृष्ट्या पिळल्या गेलेल्या अशा सर्व कष्टकरी, भूमिहीन, शेतमजूर कामगारांच्या एकंदर सर्वहारा जनतेच्या एकजुटीचा प्रयत्न होय. सामंती,सरंजामी, जातीय, ब्राह्मणी आणि भांडवली अशा एकंदर विषमतेच्या विरोधात संघर्षाचे व नकाराचे धोरण स्वीकारलेल्या,भारतातील श्रमिकांचा एकमेव पक्ष व राजकीय संघटन म्हणजे स्वतंत्र मजूर पक्ष होय.