मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊतांना खोट्या एंट्री दाखवून अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी केला आहे. त्याच बरोबर पत्राचाळ प्रकरणात सर्व मिळून ९ कंत्राटदार आहेत, यामध्ये भाजप नेते मोहित कंबोज यांचासुद्धा सामावेश असून त्यांचीही चौकशी करायला पाहिजे पण भाजपकडून त्यांच्या चौकशीची मागणी केली जाणार नाही असा आरोप सुनील राऊत यांनी केला आहे.
सध्या पत्राचाळ प्रकरणातील आरोपींची यादी भाजप नेते किरीट सोमय्या वाचून दाखवत आहेत पण त्यांनी चौकशी करत या प्रकल्पातील ९ कंत्राटदारांची माहिती काढून त्यांच्यावरही कारवाई करावी. या कंत्राटदारांमध्ये भाजप नेते मोहित कंबोज यांचाही सामावेश आहे त्यामुळे भाजप त्यांचे नाव घेणार नाही. फक्त विरोधातील नेत्यांना अडकवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. राऊतांनाही खोटे व्यवहार दाखवून फसवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप सुनील राऊतांनी केला आहे.
दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊतांना पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने ३१ जुलै रोजी अटक केली होती. त्यानंतर त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही ईडीने नोटीस पाठवत चौकशीसाठी हजर राहण्यासा सांगितलं होतं. त्यानंतर त्या आज सकाळी चौकशीसाठी हजर राहिल्या आहेत. त्यांच्यावर अलिबाग येथील जमीन व्यवहारात पत्राचाळ प्रकरणातील पैशांचा वापर केल्याचा आरोप आहे. त्याचबरोबर त्यांच्या खात्यावर आलेल्या पैशांतून दादर येथील फ्लॅट घेतल्याचाही आरोप ठेवण्यात आला आहे.
नक्की काय आहे पत्राचाळ घोटाळा
गोरेगाव येथील पत्राचाळीच्या पुनर्वसनासाठी प्रविण राऊत यांची मे. गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनी पुढे आली होती. राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि प्रविण राऊत यांचं या कामासाठी म्हाडासोबत कंत्राट झालं होतं. म्हाडा भाडेकरूंना घरे न बांधताच प्रविण राऊत यांच्या कंपनीने ९ विकास कामांना ९०१ कोटींना एफएसआय विकला आणि मेडोज नावाचा प्रोजेक्ट सुरू केला. त्याच्या नावाखाली या कंपनीने १३८ कोटी रूपये जमा केले होते. त्यानंतर म्हाडाच्या इंजिनिअरने तक्रार केल्यानंतर या कंपनीची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती.
या चौकशीत १०३९.७९ कोटी रूपयांचा गैरव्यवहार झाल्याचं चौकशीत उघड झालं. त्यामधील १०० कोटी रूपये प्रविण राऊत यांच्या अकाऊंटवर जमा झाल्याचं समोर आलं आहे. ही रक्कम प्रविण राऊत यांनी जवळच्या नातेवाईकांच्या खात्यावर ट्रान्सफर केली होती. त्यातील ५५ लाख रूपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यावर जमा झाल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे हे प्रकरण उघडकीस आलं आहे आणि याची ईडीकडून चौकशी सुरू आहे.