बर्मिंगहॅम : येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत आठव्या दिवशी भारतीय खेळाडूंनी आपला दमदार खेळ दाखवला. शुक्रवारी कुस्तीपटुंनी स्पर्धेत एकूण सहा पदकांची कमाई केली. यामध्ये तीन सुवर्णपदकांसह एक रौप्य आणि दोन कांस्य पदकांचा समावेश आहे. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये असून दिवसेंदिवस पदकांची कमाई केली जात आहे.
राष्ट्रकुल स्पर्धेत देशाच्या वेटलिफ्टर्सच्या चमकदार कामगिरीनंतर आता कुस्तीपटूंनी देखील विशेष कामगिरी केली आहे. देशाच्या सहाच्या सहा कुस्तीपटूंनी पदकावर नाव कोरलं आहे. देशाची पदकांची संख्या २६ वर पोहोचली. पुरुषांमध्ये बजरंग पुनिया, दीपक पुनिया तर महिला खेळाडूंमध्ये साक्षी मलिक यांनी सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
देशाचा दिग्गज कुस्तीपटू बजरंग पुनियाने ६५ किलो वजनी गटात कॅनडाच्या मॅकनीलला मात देऊन ही कमाल केली आहे. त्याचबरोबर साक्षी मलिकने फ्री स्टाईल ६२ किलो गटात सुवर्ण कामगिरी केली आहे. तिने कॅनडाच्या अॅना गोंझालेजला मात देत सोनेरी कामगिरी केली.
यानंतर ८६ किलो गटात दीपक पुनियाने पाकिस्तानच्या मुहम्मद इनामला झुकवून सुवर्णपदक मिळवलं. महिला कुस्तीपटू अंशू मलिकवर ५७ वजनी गटाच्या अंतिम सामन्यात नायजेरियाच्या अॅडेक्युरोये हिने मात केल्याने अंशूला रौप्य पदकावर समाधानी राहावं लागलं.
त्याचबरोबर पुरुषांच्या १२५ किलो वजनी गटात मोहित ग्रेवालने कांस्यपदकावर नाव कोरलं. तसेच ६८ किलो वजनी गटात दिव्या काकरनने कांस्य पदकाची कमाई केली.