पिंपरी चिंचवड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालयात स्थायी समिती कार्यालयावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई झाली होती. त्यातून स्थायीतील लाचखोरी तथा टक्केवारीवर शिक्कामोर्तब झाले होते.बरोबर एक वर्षाने ऑगस्ट महिन्यातच पुन्हा पिंपरी पालिका मुख्यालयातच लाचखोरीचा गुन्हा आज नोंद झाला.पालिकेच्या नगररचना व विकास विभागातील सर्व्हेअर संदीप फकीरा लबडे,वय. ४८ वर्षे यांना तीन लाख रुपये लाच मागितली म्हणून एसीबीने दुपारी ताब्यात घेऊन अटक केली.
नंतर त्यांचे घर आणि कार्यालयाची झडती घेण्यात आली.साडेतीन लाख रुपये लाच त्यांनी प्रथम मागितली नंतर तीन लाख रुपयांवर तडजोड केली होती. मात्र, एसीबीच्या पाळतीचा सुगावा लागल्याने लबडेने लाचेसाठी तगादाच लावला नाही.परिणामी ट्रॅप झाला नाही.तक्रारदार काम करत असलेल्या कंपनीचे विकास योजनेचा अभिप्राय (डी. पी. ओपिनियन) देणेसाठी प्रथम ३ लाख ५० हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती ३ लाख रुपयांची लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी पुणे एसीबीकडे तक्रार केली.प्राप्त तक्रारीची पडताळणी केली असता संदीप लबडे याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.बुधवारी (दि.३) दुपारी दोनच्या सुमारास लबडे याला ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे,अप्पर
पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक क्रांती पवार पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे,पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर,पोलीस हवालदार अयाचित,महिला पोलीस हवालदार वेताळ, पोलीस नाईक वैभव गोसावी, पोलीस शिपाई दिनेश माने,सौरभ महाशब्दे, चालक श्रीखंडे, वाळके, कदम, पांडुरंग माळी यांच्या पथकाने केली.