सोमेश्वरनगर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
लोकशाही व घटनात्मक मार्गाने वडगाव निंबाळकर – सांगवी या गटाला अनुसूचित जाती ही सोडत निघाली असताना मुठभर लोकांच्या विरोधामुळे ही सोडत बदलू नये अशी मागणी समता नगर येथील बौद्ध युवक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.याबाबत संघटनेच्या पदाधिकऱ्यांनी देशाच्या राष्ट्रपती, राष्ट्रीय एससी एसटी आयोग, राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त, जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे ई-मेल केला आहे. गेल्या पन्नास वर्षात फक्त एकदाच वडगाव सांगवी हा जिल्हा परिषदेचा गट अनुसूचित जातीसाठी राखीव झाला होता. त्यानंतर आता झालेल्या सोडतीत हा गट अनुसूचित जातीसाठी राखीव झालेला असताना काही इतर इच्छुकांनी ही सोडत चुकीची असल्याबाबत अफवा उठवल्या असून या गटाची सोडत परत घेण्याची मागणी केली आहे.
मात्र ही सोडत राज्य सरकारच्या अतिशय जबाबदार अधिकाऱ्यांनी काढली असल्याने यामध्ये चुका होणे शक्य नाही. या गटाची सोडत पुन्हा निघाल्यास गटातील अनुसूचित जातीच्या लोकांच्या न्याय हक्कावर गदा येऊ शकते. त्यांना प्रतिनिधित्व करण्याचा घटनेने दिलेला अधिकार हिरावून घेण्यात येऊ शकतो. त्यामुळे बौद्ध युवक संघटनेच्या वतीने महामहीम राष्ट्रपती, राष्ट्रीय एससी एसटी आयोग, राज्याचा निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी पुणे यांना निवेदन देण्यात आले असून आरक्षण सोडत पुन्हा काढल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला असून प्रसंगी उच्च न्यायालयात याचिका ही दाखल करण्यात येणार आहे.