मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरावर अखेर सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीची धाड पडली आहे. काहीवेळापूर्वीच संजय राऊत यांच्या मुंबईतील घरी ईडीच्या अधिकाऱ्यांचे पथक सीआरपीएफ जवानांच्या सुरक्षेसह दाखल झाले आहे. त्यानंतर ईडीने याठिकाणी तपासाला सुरुवात केली आहे. ईडीने यापूर्वी संजय राऊत यांना चौकशीला हजर राहण्यासाठी दोन समन्स बजावली होती. मात्र, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे कारण देत संजय राऊत यांनी चौकशीला जाणे टाळले होते. त्यामुळे आता ईडीचे अधिकारी संजय राऊत यांच्या घरी पोहोचले आहेत.
आता ईडीचे अधिकारी संजय राऊत यांना चौकशीसाठी आपल्या कार्यालयात नेणार का आणि त्यांना अटक करणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. प्राथमिक माहितीनुसार, ईडीचे पथक सकाळी सात वाजता संजय राऊत यांच्या मैत्री बंगल्यावर दाखल झाले याठिकाणी आल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी झाडाझडतीला सुरुवात केली आहे. सध्या ईडीच्या अधिकाऱ्यांकडून कागदपत्रे ताब्यात घेतली जात असल्याचे समजते.
संजय राऊत यांना ईडीने काही दिवसांपूर्वीच चौकशीला उपस्थित राहण्यासाठी सांगितले होते. पण संजय राऊत दिल्लीत असल्याने ते ईडी कार्यालयात उपस्थित राहिले नाहीत. त्यांनी बुधवारी वकिलांमार्फत संपर्क साधून चौकशीला उपस्थित राहण्यासाठी ७ ऑगस्टपर्यंत वेळ मागितला होता. पण ईडीने त्यांची मागणी फेटाळत त्यांना नवीन समन्स दिले होते. त्यानुसार आता संजय राऊत यांना २७ जुलैला ईडी कार्यालयात उपस्थित राहायला सांगितले होते. पण संजय राऊत तेव्हाही चौकशीला हजर राहिले नव्हते. त्यामुळे आता ईडी थेट राऊत यांच्या घरीच पोहोचली आहे. त्यामुळे आता पुढे काय घडणार, हे पाहावे लागेल.