मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय पातळीवरील सर्व विभाग आणि सेल बरखास्त केले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संमतीनुसार पक्षातील सर्व विभाग आणि सर्व सेल बरखास्त करण्यात आल्याची घोषणा करण्यात आल्याचे एक पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.दरम्यान,राष्ट्रवादीचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यालयाने या माहितीला दुजोरा दिला आहे.
फक्त राष्ट्रीय पातळीवरील सेल आणि विभाग बरखास्त केले आहेत. मात्र, राज्यातील सेल आणि विभाग याबाबत हा निर्णय घेण्यात आला नाही.खरी शिवसेना कोणती,शिवसेना विधीमंडळ पक्षातील दोन तृतीयांश फूट व त्यानंतर त्यांना वेगळा गट म्हणून विधिमंडळात तसेच संसदेत मिळालेली मान्यता यामुळे सगळ्याच पक्षांच्या नेत्यांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. दुसरीकडे याबाबत सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने सावधगिरी म्हणून हा निर्णय घेतला असण्याची शक्यता पक्षातील काही जाणकारांना वाटत आहे.
घटनेनुसार केवळ आमदार वा खासदारांमधील फूट ही फूट म्हणून ग्राह्य धरता येत नाही. त्याकरिता पक्षातही उभी फूट पडणे गरजेचे असते. पक्षातील सर्व समित्या व विभागांचे प्रमुखही दोन तृतीयांश फुटणे गरजेचे असते. पक्षातील विभाग व समित्या या तात्पुरत्या भंग केल्या असतील, तर त्याच्या पदाधिकाऱ्यांचे पद आपोआपच रद्दबातल होत असल्याने हा धोका टाळला जाऊ शकतो. त्यामुळेच हा निर्णय घेतला आहे किंवा कसे हे नजीकच्या काळात उघड झाले नाही,तरी स्पष्ट होईल असे सूत्रांकडून बोलले जात आहे.