पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क …
फसवणूक प्रकरणातील २० लाख रुपये मिळवुन देण्यासाठी पन्नास हजारांची लाच स्विकारताना हडपसर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. सागर दिलीप पोमन,वय.३३ वर्षे असे अटक केलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.याप्रकरणी सागर पोमन यांच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात प्रतिबंधक अधिनियमांतर्गत भ्रष्टाचार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत उत्तरप्रदेशातील ३२ वर्षीय तक्रारदाराने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असून, पुणे एसीबीने ही कारवाई मंगळवारी रात्री १०.४० च्या सुमारास कोरेगाव पार्क येथील मोका हॉटेलमध्ये केली.
पोलीस उपनिरीक्षक सागर पोमन हे हडपसर पोलीस ठाण्यात कार्यरत असून तक्रारदार हे व्यावसायिक आहेत.तक्रारदार यांनी फसवणुक झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती तक्रारदारांचे २० लाख रुपये परत मिळवून देण्यासाठी पोमन यांनी ५० हजारांची लाच मागितली. मात्र,तक्रारदारांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबीकडे तक्रार केली होती.पुणे एसीबीने तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली असता पोलीस उपनिरीक्षक सागर पोमन यांनी तक्रारदार यांचे फसवणुक झालेले वीस लाख रुपये परत मिळवुन देण्यासाठी पन्नास हजारांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
तसेच लाचेची रक्कम कोरेगाव पार्क येथील मोका हॉटेलमध्ये स्विकारण्याचे मान्य केले.पथकाने मंगळवारी हॉटेलमध्ये सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून दोन हजारांच्या २५ नोटा लाच स्वरुपात स्विकारताना सागर पोमन यांना रंगेहात पकडले.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे,अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पथकाने केली.