मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आलेलं शिंदे सरकार आता ठाकरे सरकारला धक्क्यावर धक्के देत आहे. ठाकरे सरकारच्या अनेक प्रकल्पांना स्थगिती दिल्यानंतर आता नगरविकास विभागाच्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे.महाविकास आघाडी सरकार असताना अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून निधी दिला जात नसल्याची तक्रार शिवसेना आमदारांची होती. याबाबत या आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली होती. पण या तक्रारीकडे दुर्लक्ष झाल्याने या आमदारांमध्ये नाराजी होती.
मुख्यमंत्री शिंदेंनी नगरविकास विभागाच्या मार्च ते जून २०२२ मध्ये मंजूर झालेल्या ९४१ कोटींच्या कामांना स्थगिती दिली आहे.काँग्रेस राष्ट्रवादीच्या आमदारांनी सुचवलेल्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. महाविकास आघाडीचं सरकार असताना अजित पवार निधी देत नाहीत,अशी तक्रार अनेक आमदारांनी केली होती. त्यानंतर आता शिंदेंनी सत्तेत आल्यावर हे बदल केलेलं दिसत आहे. दरम्यान,९४१ कोटींपैकी एकट्या बारामती नगरपरिषदेला २४५ कोटींचं वितरण करण्यात आलं होतं. मात्र आता बारामतीतल्या कामांना स्थगिती मिळाल्याने हा अजित पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.