बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
भारत कृषीप्रधान देश असून जोडव्यावसाय पशूपालन. त्यामुळे बळीराजा पुत्रवत प्राणीमात्रावर दया करतो.बैलं बारा महिने शेतीची कामे करुन धन्याची भरभराट करीत असताना त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे बैल पोळा होय.आदल्या रात्री लोणी हळद युक्त खांदेमळणी…..मांगाकडून तोरण व कासरे…. माळ्याकडून हार फुले…लोहाराकडून शिंगे घोळसणे…. नख्या काढून पत्री ठोकणे…,,सकाळी नदीवर काचळणे घासून अंघोळ….,रंगविणे ,….शिंगाना हिंगुळ लाऊन सोनेरी बेगड लावणे…पितळ्या शेंब्या….त्यावर नाचरे मोर….मस्तकांवर आरशी बाशिंग….गळ्यात कंडा…घुंगर माळा….कातडी पट्यात चाळ…सोनेरी
साखळी….दारकी….म्होरकी…वेसण…भोवरकडीचा नवा कासरा [दावं]…..पायात काळा करगुटा….अंगावर झुली ….डोळ्यांत काजळ अशी सजवलेली सर्जा राजाची जोडी होलाराच्या टफड पिपाणी शिंग ढोल ताशाच्या तालावर ग्रामदेवतेला प्रदक्षिणा मारताना मालकाच्या बाह्या फुरफूरच्या.मानपान…ईषा…भावकी…गटतट…हेवेदावे उफाळून आले तर मुक्या प्राण्यांच्या सेवेत कमतरता नसे.मिरवणूक दारी आल्यावर भाताचा घास मुटका ओवाळून टाकणे.देव्हा-यातील देव अंगणात आणून घोंगड्यावर पुजणे.कुंभारी मातीच्या बैलांच्या शिंगात शिंगुळी लाऊन पुजले जाते.सुतारी चाडं नळे व लोखंडी फाश खांद्यावर घेऊन हातात पितळी थाळं घेऊन एकजण
चावरं चावरं चांगभलं
पाठीमागचा तांब्यातील पाणी शिंपडून म्हणतो
पावूस आला चल पुढं
अक्षता टाकून पाच फे-या पूर्ण झाल्यावर सुपातील धान्याने घास भरविणे. पुरण पोळी चारुन घरीच सर्व दावणीतील जितराबांच्या पाय पडणे.ही खरी महाराष्ट्रीय संस्कृती जोपासून पै पावण्यासह पुरण पोळीवर ताव मारणे.दिस भरातील कृतज्ञता सोहळ्याने दावणीवरील बैलं निवांत रंवथ करताना धान्याच्या प्रपंच्या करीता बारा हत्तीच बळ तयार करतात.बैलाने नुसती डरकाळी फोडून माती उकरली तरी धान्याला आभाळ ठेंगण वाटायचं.
काळानुसार बैलाच्या जाग्यावर टॕक्टर व गोठा, दावणीच्या जागेवर शेड उभारुन प्रगतीच भुतागत वारं माणसांत शिरल.बारा बलुतेदारी अलुतेदारी लुप्त होऊन बाजारीकरण आले.आता तर काचेच्या शोकेस मधून बैलं बाहेर काढताना आतडं गोळा होतं.पण इलाज नाही.आठवणीचा महापूर डोळ्यांत साठला की त्यात पूर्वीच सगळं दिसतं.
आपलाच भावूक संवगडी प्रा.रवींद्र कोकरे 🌹🙏😃जुनं ते सोनं