बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
सचिन व नितीन पाटलांचा नाद करतो या कारणावरून माळेगावच्या शिवनगर येथील तुळजाभवानी मंदिरात एकावर कोयत्याने वार करत जीवे मारण्याचा धक्कादायक प्रकार घडला असून,याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात संशयित आरोपी स्वप्निल उर्फ पिल्या देऊळकर, नितीन वसंतराव तावरे पाटील, सचिन वसंतराव तावरे पाटील तिघेही ( रा.शिवनगर,माळेगाव बु, ता. बारामती,जि.पुणे ) यांच्यावर भा.द.वि कलम ३०७ ५०६ (३४) अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जखमी फिर्यादी महेश उत्तमराव पैठणकर वय.४६ वर्षे ( रा.पैठणकर वस्ती, शिवनगर,माळेगाव बु ,ता. बारामती,जि.पुणे ) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत माळेगांव पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल घुगे यांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादी महेश पैठणकर यांच्यावर १० जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजता शिवनगर येथील श्री तुळजाभवानी मंदिरात नितीन पाटील व सचिन पाटील यांच्या नादाला लागतो काय ? असे म्हणत संशयित आरोपी स्वप्निल देऊळकर याने डोक्यात व पाठीवर जिवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने प्राणघातक हल्ला केला असून,ही घटना तुळजाभवानी मंदिरातील
सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून,या हल्ल्याच्या कटात माजी उपसरपंच सचिन तावरे याचा देखील समावेश असल्याने माळेगाव परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान जखमी महेश पैठणकर यांच्यावर बारामतीत खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.या घटनेचा तपास माळेगावचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल घुगे हे करीत आहेत.