BREAKING NEWS : कोल्हापूरच्या दोघांना पुण्यात गांजा विक्री करणे पडले महागात; ५० किलो गांजासह १८ लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत..!!


पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

कोल्हापूरमधून गांजा विक्रीसाठी पुण्यात आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने कात्रज परिसरातून अटक केली.याप्रकरणी महेश श्रीपती पाटील,वय.३९ वर्षे (रा.पोलीसमळा,मु.पो.सरवडे,जि.) सध्या (रा.मिरज, सांगली ) ओंकार रवींद्र सुतार वय.२४ वर्षे (रा.सरवडे,राधानगरी कोल्हापूर) या दोघांवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधीद्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम २० (b),(ii),२९,८ (c) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे अमली पदार्थ विरोधी पथकाचे हवालदार,(वय.४३ वर्षे ) संदिप सोनबा जाधव यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत भारती विद्यापीठ पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार,अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड हे आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थाच्या अनुषंगाने मध्यरात्री गस्त घालत होते.यावेळी कात्रज येथील सर्व्ह नं.५३ प्लॉट क्र.१७ (बी) येथील रॉयल पंजाब रेस्टॉरंट बार समोर रात्री १.१० वाजता त्याठिकाणी असणाऱ्या सार्वजनिक रोडवर एक सिल्व्हर रंगाची ईरटिगा कार व त्यामध्ये दोघेजण कावऱ्या बावऱ्या नजरेने इकडे तिकडे पाहत असताना निदर्शनास आले.त्यांची आणि साध्या वेशातील पोलीस कर्मचाऱ्यांची नजरानजर होताच ते गडबडून गेले. एकमेकांशी कुजबुज करु लागले.

तेव्हा पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांना थांबवून चौकशी केली .संशयित आरोपींच्या ताब्यातील गाडीमध्ये काहीतरी संशयास्पद वाटल्याने त्यांच्या ताब्यातील गाडीची झडती घेतली असता,गाडीच्या डिक्कीमध्ये दोन हिरव्या पिवळ्या रंगाची पोती असल्याचे दिसून आले,पोलिसांनी तोंड न उघडता हातानी दाबून पाहिले असता त्यामध्ये झाडा पाल्यासारखा पदार्थ असल्याचे जाणवल्याने,त्याचा वास घेतला असता उग्र स्वरूपाचा वास आल्याने पोत्यांमध्ये गांजा सारखा अमली पदार्थ असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.गाडीच्या डिकीमध्ये दोन पोत्यांमध्ये १० लाख १२ हजार ४०० रुपयांचा ५० किलो ६२० ग्रॅम गांजा,५ हजार ५०० रुपये रोख, तीन मोबाईल व इरटिगा गाडी असा १८ लाख २५ हजार ४०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई अमंली विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड,सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे,पोलीस हवालदार प्रविण उत्तेकर,मारुती पारधी, मनोज साळुंके,विशाल दळवी,संदिप शिर्के,पांडुरंग पवार, चालक पोलीस शिपाई मोहिते यांच्या पथकाने केलेली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *