पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
नवीन सिरीजच्या नोटा देण्याचे आमिष दाखवून नोटांच्या बदल्यात खेळण्यातील नोटांचे बंडल देऊन चोरट्यांनी एका व्यावसायिकाला तब्बल ३५ लाखांना गंडा घातल्याची घटना समोर आली असून,याप्रकरणी संशयित आरोपी सादिक मुबारक शेख (रा.नॉर्थ मेन रोड, कोरेगाव पार्क), जसविंदर सिंग तारासिंग गुणदेव (रा. रविवार,पेठ) आणि जितेंद्र मेहता (रा.भरुच,गुजरात) या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कॅम्पमधील ५२ वर्षाच्या व्यावसायिकाने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.हा प्रकार २२ मे ते २८ जून दरम्यान कॅम्पमधील कुमार पॅव्हिलियन येथे घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, फिर्यादींचा ट्रेडिंगचा व्यवसाय असून कॅम्पमधील कुमार येथे कार्यालय आहे.फिर्यादी यांच्या ओळखीचे मित्र शरीफ खान हे सादिक शेख यांना २२ मे रोजी कार्यालयात घेऊन आले.आमच्याकडे ५०० रुपयांच्या नवीन सिरीजच्या नोटा आहेत.त्यामुळे तुम्हाला एका नोटेच्या बदल्यात दुप्पट नोटा मिळतील असे शेख याने सांगितले.तुम्ही गुंतवणुकीस तयार असाल तर मी तुम्हाला डबल नोटा मिळवून देईल असे अमिष दाखवले. तूम्ही १० लाख रुपये गुंतविले तर २० लाख रुपयांचा फायदा होईल,असे सांगितले. त्यावर फिर्यादींनी त्यांना विचार करुन सांगतो असे कळविले.
त्यानंतर २६ मे रोजी सादीक शेख हा जसविंदरसिंग याला घेऊन आला.त्याने सांगितले की,जितेंद्र मेहता आपणास एकाच्या बदल्यात दोन याप्रमाणे नविन सिरीजच्या नोट देणार आहे.त्यांनी जसविंदर सिंग याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला.त्यानंतर २८ मे रोजी त्यांनी बँकेतून २० लाख रुपये काढून त्यांना दिले.त्यांनी उद्या नवीन सिरीजच्या ४० लाख रुपये मिळतील असे सांगितले.दुसऱ्या दिवशी त्यांनी फोन करुन विचारल्या नंतर त्यांनी भुज येथे जायचे आहे,असे सांगितले. त्यांच्या कार्यालयातील आशिष शहा यांना व आणखी १५ लाख रुपये घेऊन भुज येथे गेले.तिथे पोहोचल्यावर त्यांनी जितेंद्र मेहता यांच्याशी संपर्क साधला.
तेव्हा त्यांनी नविन सिरीज असलेल्या नोटांची बॅग दाखविली जितेंद्र मेहता यांच्याशी फिर्यादी यांच्याशी संपर्क करुन दिला.तेव्हा मेहता यांनी तुम्हाला ४५ लाख रुपयांच्या बदल्यात नविन सिरीजचे एक कोटी मिळतील असे सांगितले.त्यानंतर त्यांनी बरोबर घेतलेले १५ लाख रुपये जसविंदरसिंग व सादीक शेख यांच्या ताब्यात दिले. त्यानंतर तिघांनी तुमची रक्कम तुमच्या ऑफिसला येईल असे सांगितले. त्यानंतर ते पुण्यात परतले.पुण्यात आल्यानंतर ८ जून रोजी जसविंदरसिंग ऑफिसमध्ये बॅग ठेवून गेल्याचे ऑफिस बॉयने त्यांना सांगितले.त्यानंतर त्यांनी बॅग उघडून पाहिले असता त्यात मुलांच्या खेळण्यातील नोटा असल्याचे दिसून आले.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी लष्कर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली.या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिळीमकर तपास करीत आहेत.