मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
महाराष्ट्रातील सत्तांतराचा वाद थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचला असून,न्यायालयाने शिवसेनेतील बंडखोर १६ आमदारांना मोठा दिलासा दिला आहे.बंडखोर आमदारांवर १२ जुलैपर्यंत अपात्रतेची कारवाई न करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच या प्रकरणावरील पुढील सुनावणी ११ जुलै रोजी होणार असल्याचे म्हटले आहे.दरम्यान, न्यायालयाच्या या आदेशानंतर गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये असलेल्या एकनाथ शिंदे यांनी ट्वीट केले आहे.
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, न्यायालयाचा आजचा निकाल हा वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय..! असल्याच्या भावना एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान,आज सर्वोच्च न्यायालयात पार पडलेल्या सुनावणी दरम्यान, न्यायालयाने केंद्र सरकार, राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी आणि शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांना कोर्टाने नोटीस बजावली आहे. तसेच या नोटीशीला पाच दिवसांत उत्तर देण्यास सांगण्यात आले असून, या प्रकरणावरील पुढील सुनावणी ११ जुलै रोजी होणार आहे.तर,नोटीस बजावलेल्या १६ बंडखोर आमदारांना अपात्रतेच्या नोटीशीला १२ जुलैपर्यंत उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे.या सर्वामध्ये न्यायालयाच्या निर्णयावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना केवळ ही कायदेशीर लढाई आहे ती चालत राहिल असे मोजक्या शब्दांत उत्तर दिले आहे.