पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
ज्ञानोबा माऊली-तुकाराम’ असा नामघोष, टाळ-मृदंगाच्या तालावर होणारा विठूनामाचा गजर…तुळशी वृंदावन आणि दिंड्या-पताका…अशा भक्तिमय वातावरणात आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने पंढरपूरकडे प्रस्थान केले. दोन वर्षानंतर पायी वारी होत असल्याने वारकऱ्यांचा अमाप उत्साह यावेळी जाणवत होता.गेली दोन वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पायी वारी रद्द झाली होती. यंदा कोणत्याही निर्बंधाविना वारी होत असल्याने भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
देहू मंदिरात खासदार श्रीरंग बारणे यांनी सपत्निक पादुकांचे पुजन आणि आरती केली.यावेळी आमदार रोहित पवार, सुनील शेळके, माजी आमदार उल्हास पवार यांच्यासह बारामती हाय-टेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार पूजेला उपस्थित होते.त्यानंतर उपस्थित सर्वजण वारकऱ्यांसह टाळ-मृदुंगाच्या गजरात दंग झाले.यावेळी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प.नितीन मोरे, पालखी सोहळा प्रमुख माणिक मोरे,संतोष मोरे,विशाल मोरे, संस्थांचे विश्वस्त संजय मोरे, भानुदास मोरे, अजित मोरे आदी उपस्थित होते.महापूजेनंतर पालखीने इनामदार वाड्यातील मुक्कामाकडे प्रस्थान केले.