पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
पुणे महापालिकेत शिपाईपदासाठी नियुक्ती केल्याचे नियुक्तीपत्र देऊन तीन तरुणांकडून १६ लाख १० हजार रुपये घेतल्याप्रकरणी अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कोथरुडमध्ये राहणाऱ्या एका २४ वर्षाच्या तरुणाने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यानुसार आशिष उबाळे,संदीप उदमले आणि यवशोब देवकुळे या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार गुजरात कॉलनीत ३ नोव्हेबर २०२० ते ४ जानेवारी २०२२ दरम्यान घडला आहे.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांच्या कार्यालयात शुक्रवारी एक व्यक्ती आली.तिने त्यांची नियुक्ती शिपाई पदासाठी झाल्याचे सांगितले.त्याच्याकडे नियुक्तीचे पत्रही होते.त्यावर महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्यासह आजी माजी तीन अतिरिक्त आयुक्तांच्या सह्या होत्या.हे पत्र बनावट असल्याचे बिनवडे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने या पत्राची चौकशी करण्याचे आदेश दिले.संबंधित व्यक्तीकडे चौकशी केल्यानंतर त्याने नोकरी मिळविण्यासाठी ३ लाख रुपये दिल्याचे सांगितले. महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी याप्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. विक्रमकुमार यांनी थेट पोलीस आयुक्तांशी संपर्क साधून तातडीने गुन्हा दाखल करावा व आरोपींना अटक करण्याची विनंती केली होती.
याबाबत नेमकी फिर्याद कोणी द्यायची याविषयी चर्चा चर्वण झाल्यानंतर रविवारी रात्री उशिरा फसवणुक झालेल्या तरुणाची फिर्याद घेण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपींनी संगनमत करुन फिर्यादी व फिर्यादी यांचे दोन मित्र यांना महापालिकेत शिपाई पदावर नोकरी लावतो, असे सांगून त्यांच्याकडून एकूण १६ लाख १० हजार रुपये घेतले.
तिघांना महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्तांच्या नावाने प्रत्येकी ३ बनावट नियुक्ती पत्रे देऊन ती खरे असल्याचे सांगून फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कोथरुड पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे.या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक साबळे हे करीत आहेत.