Pune News : समाज कल्याण विभागाच्या ७७ निवासी शाळांची लक्षणीय कामगिरी, निकाल १०० टक्के..!!


मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन

पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

राज्यात समाज कल्याण विभागामार्फत चालविण्यात येणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसूचित जाती मुलां व मुलींच्या शासकीय निवासी शाळेमधील विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. राज्यात कार्यरत असलेल्या एकूण ९० पैकी ७७ निवासी शाळांचा निकाल हा १०० टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांच्या या लक्षणीय कामगिरीबद्दल सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी निवासी शाळेतून उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

या सर्व शाळांमधून ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणारे ११९ विद्यार्थी आहेत हे विशेष. ६ शाळांचा निकाल ९५ टक्के लागला आहे, तर ४ निवासी शाळांचा निकाल ९० टक्के लागला आहे. या सर्व निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांमधून अमरावती विभागाच्या रुपाली रमेश सभादींडे हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिला ९५.८० टक्के गुण मिळाले आहेत. द्वितीय क्रमांक गायत्री रामकृष्ण सरदार ९५.२० टक्के, तर तृतीय क्रमांक ममता बाळू तायडे हिला ९५ टक्के गुण मिळाले आहेत. समाज कल्याण विभागाच्या शाळांमध्ये मुलींनी उल्लेखनीय यश मिळविले आहे.

राज्यातील सर्व निवासी शाळांच्या कामगिरीबद्दल सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे,राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम,सचिव सुमंत भांगे,आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांनी सर्व विद्यार्थी, शाळांचे मुख्याध्यापक, कर्मचारी, शिक्षक यांचेदेखील अभिनंदन केले आहे.

चौकट :

राज्यातील अनुसूचित जातीच्या मुला-मुलींच्या इयत्ता दहावीतील लक्षणीय यशाबद्दल विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. येणाऱ्या काळात देखील गुणवत्ता वाढीसाठी अधिक प्रयत्न विभागाच्यावतीने करण्यात येणार असून लवकरच या निवासी शाळांमध्ये सीबीएससी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.

डॉ. प्रशांत नारनवरे, आयुक्त समाज कल्याण विभाग


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *