बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
शरद पवार इन्स्पायर फेलोशीप शिबिरात सहभागी युवकांनी आपल्या नव्या संकल्पनांचा समाजाला उपयोग करून देण्याचे ध्येय समोर ठेवताना सातत्यपूर्ण प्रयत्नांवर भर द्यावा,असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.बारामती येथे आयोजित शरद पवार इन्स्पायर फेलोशिप उन्हाळी शिबिराच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पवार म्हणाले, शिबिरात सहभागी युवकांची राज्यभरातून निवड झाली असल्याने त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण आणि कृषी,कला, साहित्य,संरक्षण,क्रीडा आदी विविध क्षेत्रात योगदान असणारे ज्येष्ठ नेते शरद पवार अशा दोन मोठ्या व्यक्तिमत्वांची नावे शिष्यवृत्तीशी जोडली गेली असल्याने त्याला साजेसे कार्य करण्याची जबाबदारी शिबिरात सहभागी युवकांवर आहे.शिबिराच्या माध्यमातून समाजाला उपयुक्त असणारा वेगळा विचार करणारे तरुण पुढे यावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.ते म्हणाले,समाजासाठी आवश्यक कृषी आणि कृषीपुरक व्यवसायाशी निगडित नव्या कल्पना तरुणांनी पुढे आणाव्यात.आज शेतीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघणे गरजेचे आहे.कृषी क्षेत्रात जागतिकस्तरावर नवे संशोधन होत आहे.
हे संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी नव्या संकल्पना समोर आणाव्यात,आपल्या प्रयत्नात आणि संशोधनात सातत्य ठेवावे.समाजाला उपयुक्त असणारा हा उपक्रम पुढे जायला हवा,असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर,उद्योगपती गौतम अदानी,खासदार सुप्रिया सुळे,एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.विवेक सावंत,डॉ.सी.डी.माई,प्रीती अदानी, ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार आदी उपस्थित होते.