बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
पुरंदर तालुका कृषी कार्यालय आणि कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने चांबळी (ता. पुरंदर) येथे मका पिकावरील लष्करी अळी जागृती अभियान कार्यक्रम संपन्न झाला.याप्रसंगी भोसले यांनी मका पिकावरील लष्करी अळीचा जीवनक्रम व नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांना माहिती देवून ते पुढे म्हणाले,मका पिकावरील लष्करी अळी मुळे जनावरांना चाऱ्याची टंचाई भासू लागली आहे.
या आळीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शेतकरी जास्त तीव्रतेची औषधे फवारणी करून आळीचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न करतात. परंतु त्या औषधांचा जनावरांच्या आरोग्यावर व दुधावर परिणाम होत असतो. त्यामुळे लष्करी आळीचा बंदोबस्त प्राथमिक अवस्थेमध्ये निंबोळी युक्त किटकनाशकांचा वापर करून करावा.
मका पेरताना बीजप्रक्रिया करून पेरणी करावी, असेही त्यांनी सांगितले.कृषी पर्यवेक्षक जगताप यांनी हुमणीचे नियंत्रण,जीवनक्रम व उपाययोजनेविषयी माहिती दिली. मनोज शेंडकर यांच्या शेतावर प्रकाश सापळ्यांचे महत्त्व सांगून त्याचे प्रात्यक्षिकही करून दाखवले.ते पुढे म्हणाले,हुमनी पिकाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेणखता मध्ये मेटारायझियम बुरशीचा वापर करावा. येत्या खरीप हंगामामध्ये पेरणी करताना स्फुरद विरघळणारे जिवाणू, अझोटोबॅक्टर, रायझोबियम या जिवाणूसंवर्धन खताची बिज प्रक्रिया करून रासायनिक खतांची बचत करावी, असेही त्यांनी सांगितले.
कृषी सहाय्यक विजय जाधव यांनी फळबाग लागवड व कृषी खात्याच्या योजनाविषयी माहिती देऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हुमणी साठी प्रकाश सापळे लावण्याचे आवाहन केले.या कार्यक्रमास कृषी पर्यवेक्षक गणेश जगताप,कृषी सहाय्यक विजय जाधव,चांबळी गावच्या सरपंच प्रतिभा कदम,कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे सिनिअर रिसर्च फेलो आशिष भोसले आणि शेतकरी उपस्थित होते.