Daund Crime : हॉटेल चालकास साडे चार लाखांचा गंडा घालणाऱ्या तोतया फुड इन्स्पेक्टरला यवत पोलिसांनी घेतले ताब्यात..!!


यवत पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाची कामगिरी

दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..

दौंड तालुक्यातील यवत येथील कांचन व्हेज या प्रसिद्ध हॉटेलच्या चालकास ४ लाख ४२ हजार ५०० रुपयांचा गंडा घालणाऱ्या तोतया फुड इन्स्पेक्टरला यवत पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी संशयित आरोपी सुरज सुरेश काळे,वय ४० वर्षे (रा.मधूबन नगर,सोलापूर) धर्मराज शिवाप्पा शिकलवाडी वय. ३६ वर्षे ( रा.रामवाडी धोंडिबा वस्ती, सोलापूर) यांच्यावर यवत पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ४२० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार,दि.३ जून रोजी दुपारी यवत येथील कांचन व्हेज या प्रसिद्ध हॉटेलच्या मालकास आरोपीने मुंबई मंत्रालयातुन फुड इन्स्पेक्टर असल्याचे भासवुन तुमच्या हाॅटेलची तक्रार माझेकडे आलेली आहे.तुमच्या हाॅटेलमुळे एका महीलेला फुड पाॅयझनिंग झाले असल्याने,तिने माझ्याकडे तक्रार दिलेली आहे.त्यामुळे आमची टिम तुमचे हाॅटेल सिल करण्यासाठी तुमच्याकडे येत आहे.तुमच्यावर कारवाई करायची नसेल तर तुंम्ही मी सांगतो त्या खात्यावर पैसे जमा करा असे सांगुन सदर हॉटेल मालक यांच्याकडून वेळोवेळी तब्बल ४ लाख ४२ हजार ५०० रूपये ऑनलाईन घेत हॉटेल चालकाची फसवणुक केली.

या गुन्हयाच्या अनुषंगाने यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी या गुन्ह्याचा तपास गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे यांच्याकडे देऊन गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणावयास सांगीतले होते.पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे यांनी तपासाची सूत्रे फिरवून हा संशयित आरोपी वेगवेगळ्या बोगस मोबाईल नंबर वरून फोन करत असुन तांत्रिक माहितीच्या आधारे ते सोलापूर येथे असल्याबाबत माहिती झाल्याने यवत पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने सोलापूर येथे जात हे दोघेही एका ऑनलाइन मनी ट्रान्सफर शॉपवर फिर्यादी यांनी पाठवलेले पैसे नेण्याकरिता आले असता त्यांना तांत्रिक माहितीच्या आधारावर रिक्षामधून पळून जात असताना त्यांच्या पाठलाग करून अतिशय शिताफीने पकडून जेरबंद केले आहे.

ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस,पोलीस निरीक्षक नारायण पवार यवत पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे,पोलीस नाईक राम जगताप,पोलीस कर्मचारी प्रवीण चौधर,मारुती बाराते यांच्या पथकाने केलेली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *