बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
भारतामध्ये भाजीपाल्याचे प्रतिवर्षी सुमारे १६२९ लाख मे.टन एवढे उत्पन्न होते.भारत भाजीपाला उत्पादनामध्ये चीननंतर दुसर्या क्रमांकावर असून जगातील एकूण उत्पादनाच्या १५% भाजीपाला उत्पादन भारतात होते आणी त्यातही महाराष्ट्र राज्य अग्रेसर आहे.सध्या शेतकरी बांधवांना भाजीपाला उत्पादन घेताना बऱ्याच अडचणी येत आहेत यातील प्रमुख अडचण जमिनीतून येणारे विविध बुरशीजन्य रोग व पिकांवर येणारे जैविक व अजैविक ताण.
हीच अडचण लक्षात घेऊन भाजीपाला गुणवत्ता केंद्र, बारामती आणी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक,पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यामध्ये कलमी भाजीपाला पिकांचे प्रात्यक्षिक प्रकल्प आजपासून सुरु झाला आहे. या प्रकल्पांतर्गत पुणे जिल्ह्यातील पुरंदर, बारामती व दौंड या तालुक्यातील १०० शेतकर्यांची निवड या प्रात्यक्षिकाकरिता करण्यात आली आहे व त्यांच्या शेतावर ५० कलमी वांगे व ५० कलमी ढोबळी मिरची यांचे प्रात्यक्षिक घेण्यात येत आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश जमिनीतून येणाऱ्या बुरशीजन्य रोगांचे नियंत्रण करणे,पिकामध्ये २०% ते २५% उत्पादन वाढ व पिकाचा उत्पादन देण्याचा कालावधी वाढविणे. या प्रकल्पांतर्गत या १०० शेतकरी बांधवांना याचे सर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे तसेच प्रत्यक्ष शेतावर जाऊनही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
आजच्या कार्यक्रमामध्ये यशवंत जगदाळे,विषय विशेषज्ञ – उद्यानविद्या व या प्रकल्पाचे प्रमुख यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात कलमी भाजीपाला रोपे शेतकरी बांधवांना देण्यात आली.या कार्यक्रमासाठी एकूण ५३ शेतकरी पुरंदर, बारामती व दौंड तालुक्यामधून उपस्थित होते. या प्रकल्पासाठी अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट,बारामतीचे चेअरमन श्री. राजेंद्रदादा पवार व मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन होत आहे.