मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे.देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावरून फेसबुक आणि स्वत: ट्विट करून ही माहिती दिली. माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्हि आली आहे. मी सध्या होम आयसोलेशनमध्ये आहे.डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार माझे उपचार आणि औषधपाणी सुरु आहे. गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
कोरोना झाल्यानंतर साधारण सात दिवस क्वारंटाईन राहावे लागते. त्यामुळे १० जून रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीला देवेंद्र फडणवीस कसे उपस्थित राहणार, हे पाहावे लागेल. देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारीच महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेट घेतली होती. त्यामुळे या नेत्यांचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येणार का,याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या परिस्थिती चिंताजनक नसली तरी सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा आवर्जून वापर करा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिल्या आहेत. मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णांचा आकडाही आता ७०० च्या आसपास जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत मुंबईसह राज्यात कोरोनाची लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.