Anti Corruption Bureau : अवैध वाळू वाहतूकीसाठी दीड लाखाची लाच मागणारा तहसिलदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..!!


महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

लातूर (Latur) जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात तहसीलदार गणेश जाधव यांना दीड लाख रुपयांची लाच स्विकारताना एसीबीने रंगेहात पकडले.निलंगा तालुक्यात वाळूचा उपसा मोठ्या प्रमाणात होत असतो.एका व्यक्तीला वाळूच्या तीन ट्रक नियमितपणे कोणतीही कारवाई न करता चालू देण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती.

मिळालेली माहिती अशी, तक्रारदाराकडून वाळूच्या तीन ट्रक नियमितपणे चालू देण्यासाठी व वाळूच्या ट्रकवर या पुढे कारवाई न करण्यासाठी प्रती ट्रक ३० हजार या प्रमाणे दोन ट्रकचे ६० हजार महिना या प्रमाणे ती महिन्याचे १ लाख ८० हजार रुपये तहसिलदार जाधव यानी मध्यस्थामार्फत मागितले होते. तडजोडीनंतर दीड लाखाची रक्कम एजंट रमेश मोगेरगे यांचे कडे देण्यास सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे आज रोजी रमेश मोगेरगे याने निलंगा येथे तहसीलदार जाधव यांच्या घरासमोरच लाचेची रक्कम दीड लाख रुपये पंचासमक्ष घेतली.

दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने तात्काळ दोन्ही आरोपींना पकडले. या कारवाईने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान लातूर जिल्ह्यातील मांजरा व तेरणा नदीत अवैध वाळू उपशासाठी बोटींचा सर्रास वापर केला जात आहे. पर्यावरण विभागाचे सगळे नियम धाब्यावर बसवून हे प्रकार सुरू आहेत.अवैध वाळू उपशा संदर्भात अनेक तक्रारी असूनही तहसिलदार कारवाई करत नव्हते.तहसिलदार जाधव यांच्या औरंगाबादेतील घरावर देखील छापे टाकण्यात आल्याचे समजते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *