बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
आसेतुहिमाचल जिच्या धर्मशीलतेच्या पताका तीनशे
वर्ष होत आली तरीही आजही दीमाखात फडकत आहेत अशा अहिल्येची हि कहाणी.अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या गावी माणकोजी आणि सुशिलाबाई शिंदे यांच्या पोटी अहिल्येचा जन्म झाला. गावचा पाटील असल्यामुळे ग्रामदैवताची देखभाल करण्याची माणकोजी यांच्या कुटुंबाकडे जबाबदारी होती. रोज देवळात दिवाबत्ती करणे अशासारखे काम लहानपणापासूनच अहिल्या करत असे.मुलगी असूनही तिला वडीलांनी लिहाय वाचायला शिकवले होते. मराठी हिंदी संस्कृत या भाषा, तसेच मोडी लिपी तिला अवगत होती.
तलवार चालवणे, घोड्यावर बसणे, दांडपट्टा चालवणे, नेम धरणे, तीर मारणे, बचावात्मक पवित्रा घेणे यासारख्या युद्धकौशल्याचे प्रशिक्षण तिला देण्यात आले होते.नदीकाठी वाळूत शिवलिंग बनवणे हा तिचा आवडता खेळ.एकदा अशीच शिवलिंग बनवत असताना मराठ्यांचा घोडा उधळला तिच्या बरोबरच्या मुली बाजूला धावल्या. पण अहिल्या तिने बनवलेल्या शिवलिंगावर हात धरून तिथेच थांबली. ते बघून बाजीराव पेशवे यांनी तिला विचारले ,”वेडी आहेस का? वाळूचे ढीगा जवळ का बसून राहिलीस? तिने न घाबरता उत्तर दिले ,”ती वाळू नाही शिवलिंग आहे आपण जे बनवले त्याचे रक्षण नको करायला?”पेशवे आणि मल्हारराव होळकर यांनी खंडेरावा साठी योग्य जोडीदार म्हणून तिची निवड केली सतराशे तेहतीस मध्ये नऊ वर्षाचा खंडेराव आणि आठ वर्षाची अहिल्या यांचा विवाह झाला..
१७३५ मधे खंडेरावाला दोन गावांची जहागीर मिळाली प्रत्येक आनंदाच्या क्षणी देवापुढे नतमस्तक होणे हि होळकर घराण्याची रीत. नमस्कार करत असताना आपण मल्हारराव आणि गौतमाबाईंचा हात धरून या वाड्याच्या मध्यभागी उभे आहोत असे तिला जाणवले. त्या क्षणी तिने ठरवले सासुबाई जे जे करत आहेत ते ते मी केले पाहिजे.मुलापेक्षा सून चाणाक्षआहे हे मल्हाररावांनी ओळखले होते.पत्रांची ने आण करणाऱ्या काशीद जोडयांवर लक्ष ठेवणे, त्यांची जेवणाखाण्याची व्यवस्था बघणे,हुंड्या वटवून पैसा उभा करणे तोफांसाठी दारू कशी करायची तोफांचा कारखाना युद्धभूमी पासून किती अंतरावर लावायचा विशिष्ट तोफा वाहून नेण्याचे काम कसे करायचे त्यासाठी बैलगाड्यांची निवड कशी करायची हे मल्हाररावांनी अहिल्याबाईस शिकविले .मल्हाररावांनी खजिन्याची किल्ली मोठ्या विश्वासाने अहिल्याबाईच्या ताब्यात दिली.
अहिल्याबाईंना मालेराव हा मुलगा आणि मुक्ताबाई ही मुलगी झाली. लढाईच्या वेळेस मराठ्यांमध्ये बारगीरां पासून सरदारापर्यंत सर्वांचे कुटुंब कबिले बरोबर असायचे.खंडेरावांबरोबर गेल्यामुळे अहिल्या प्रत्यक्ष रणभूमिचे दर्शन घेऊ शकली.तोफांचे आवाज, लढाईच्या मसलती, गनिमी काव्याचे डावपेच, आपले मुलुख परगणे, माळव्यातली सत्ता,पुण्याचे पेशवे, सातारची छत्रपतींची गादी यासंबंधीची माहिती मल्हार राव खंडेराव यांना करून देत असताना एकाग्रतेने अहिल्याबाई ते ऐकत. खंडेराव यांना स्वतःची अशी राजकीय दूरदृष्टी नव्हती. वैभवाचा उपभोग घेत देवधर्म करावा धार्मिक संकेतानुसार पत्नीशी वागणूक, कर्तव्य पार पाडणे आणि मद्य मदीराक्षी समवेत मौज मजा करावी हा सर्वसामान्य पुरुषांप्रमाणे त्यांचाही स्वभावधर्म होता.१७ मार्च सतराशे ५३ रोजी खंडेराव होळकर दुपारच्या भोजनानंतर भांगेची घुटी घेऊन नादात डेऱ्या बाहेर पडले. मोर्चाच्या निशाणा पाशी येताच अचानक फिरत्या तोफेतून गोळा आला त्याने खंडेरावाचा वेध घेतला.
मल्हारराव सतत मोहिमांवर असतं म्हणून सतराशे ५४ नंतर अहिल्याबाईच्या नावाने कागद पत्र जारी करायला त्यानी सुरुवात केली.मुलकी कारभार त्या स्वतंत्रपणे सांभाळू लागल्या.गोहद चे राज्य ताब्यात घेण्याचे मनसुबे मल्हाररावांच्या मनात चालू होते. अहिल्याबाईंना त्यांनी ग्वाल्हेर येथे थांबायला सांगितले.अहिल्याबाईंनी स्वतः च्या अधिकारात गोहदवर तोफा डागल्या.मल्हाररावांना हे पटले नाही.आत्ता जरि त्यानी गढी खाली केली असली तरी पुन्हा लढाईची शक्यता होती. त्यांनी अहिल्याबाईंना सल्ला दिला प्रतिष्ठेने शक्य तितके दबावाने काम करून घेणे अगदी शेवटी हल्ला करणे. त्यानंतर अहिल्या बाई पुन्हा कधीही रणभूमीत उतरल्या नाहीत. वीस मे सतराशे ६६ मध्ये आलमपूर येथे मल्हाररावांचा मृत्यू झाला.
मालेरावला जरी गादी चे वारस बनवले तरी राज्यकारभाराचा भार तो सहन करू शकणार नाही याची अहिल्याबाई आणि पेशव्यांना जाणीव होती. आपल्या दासीशी संबंध असल्याच्या संशयावरून मालेरावाने एका विणकरावर प्राणघातक हल्ला केला. त्यात विणकराचा मृत्यू झाला. न्यायप्रिय अहिल्याबाईनी विण करा विषयीची चौकशी थांबवली नाही. विणकर आपल्या समोर उभा आहे असे भास मालेरावांना सतत होऊ लागले अखेर त्यातच मालेरावाचा मृत्यू झाला.
गादीच्या वारसाचा प्रश्न उपस्थित झाला. गंगोबा तात्यांनी राघोबादादांना मालेराव यांच्या निधनाची वार्ता कळवली. अहिल्याबाई महेश्वर येथून दौलतीचा कारभार बघत असत राघोबादादा महेश्वर कडे यायला निघाले ही बातमी अहिल्याबाईस कळली. पेशव्यांकडे त्यानी तुकोजिराव होळकरसाठी थेट सरकारी नोकरीचा अधिकार मागितला. सुभेदार पदाचा उल्लेखही पत्रात केला नाही.
दत्तक पुत्र घ्यायचा की नाही ठरवण्याचा अधिकार आमचा आहे. असे ठणकावून सांगत राघोबादादांना भेटायला त्या हत्तीवरून गेल्या. थोरले माधवराव पेशवे यांनी काकांना सर्व उद्योग थांबवण्याचे आदेश दिले. अहिल्याबाईंना कारभाराचे अधिकार दिले. यावेळेस त्या ४२ वर्षांच्या होत्या.ईश्वराने ज्या जबाबदाऱ्या माझ्यावर सोपवल्या आहेत त्या मला पार पाडायच्या आहेत सत्तेवर येताच घेतलेली ही शपथ ,अखेरपर्यंत तिच्याशी त्या प्रामाणिक राहिल्या. विश्वस्त म्हणून काम केलं तरी त्यांनी हातातली सत्ता कधीच सोडली नाही. रयतेच्या कल्याणासाठी दौलतीचे धन कामी यावे असा प्रयत्न अहिल्याबाई करत असत.फौजेसाठी त्यांनी पैसे द्यावे म्हणून नाना फडणीस आणि तुकोजी यांचा प्रयत्न अहिल्याबाई उधळुन लावित. प्रसंगी प्राणाची बाजी लावायला मागेपुढे पाहणार नाही असेही त्यांनी बोलून दाखवले पण ही वेळ त्यांच्यावर आलीच नाही आपली ताकद त्या ओळखून होत्या पण त्याचा गैरवापर त्यांनी कधीही केला नाही. त्या कायम पेशव्यांशी एकनिष्ठ राहिल्या. त्या मराठेशाहीच्या आधारस्तंभ होत्या पण निर्णय प्रक्रियेत त्या कोठेही नव्हत्या.
नद्यांवर घाट बांधणे, अन्नछत्र चालवणे, पाणपोया ,विहिरी बांधणे,धर्मशाळा उभारणे, मंदिरांचा जीर्णोद्धार, हिमालयाच्या कुशीत उष्ण पाण्याचे झरे खोदणे, हे केवळ धर्मभोळेपणाचे संकल्प नव्हते. ब्रिटिश चहुबाजूंनी हातपाय पसरू लागले होते दिल्लीची बादशाही खिळखिळी झाली होती मराठ्यांची राजधानी सातारा दुबळी झाली होती पेशव्यांचा जोर ओसरला होता आपापसातले तंटे वाढले होते मराठेशाहीचे जहाज बुडणार हे तिने ओळखलं अशा वेळेस भारतीयांमध्ये अस्मिता जागृत करण्याचे काम या संकल्पनेतून तिला साध्य करायचे होते.विधवांना नवर्याच्या मालमत्तेचा अधिकार मिळवून देणे, दत्तक पुत्र घेण्याचा अधिकार विधवेस मिळवून देणे, लेकी सुनांना सती जाण्यापासून परावृत्त करणे या सारख्या सुधारणा अहिल्याबाईंच्या काळात महिलांच्या बाबतीत झाल्या त्यांनी स्वतःच्या मुलीचा तर आंतर जातीय विवाहही करून दिला.
रयतेसाठी मातेसमान,महेश्वरी साडीच्या पोता प्रमाणे तलम मृदू मुलायम, शंकराची निस्सीम भक्त असणारी अहिल्या ,राजकारणात शंकरा प्रमाणे करारी होती.
सती अहिल्या या कवितेत शांता शेळके म्हणतात
अजून कोटी लिंगार्चन चाले नित्य नर्मदे काठी/शिव निर्मल्यापरी सतीने विभव मानीले सारे/गुणगौरव साध्विचा गाती आजही तिथले वारे/ राज योगिनी सती अहिल्या होळकरांची राणी/अजुनी नर्मदा जळी लहरती तिच्या यशाची गाणी.ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण..!!
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर या अतिशय पारदर्शक राज्यकारभार करणाऱ्या दानधर्म करणाऱ्या हिंदू देवतांचा जीर्णोद्धार करणाऱ्या भारतातील एकमेव लोकमता होऊन गेल्या जगाने त्यांना केलेल्या पुण्याबद्दल पुण्यश्लोक ही पदवी मानवजातीमध्ये फक्त अहिल्यादेवी होळकर यांना बहाल करण्यात आली आहे..
!!पुण्यश्लोको नलो राजा !!पुण्यश्लोक युधिष्ठीरा!! पुण्यश्लोको जगन्नाथा!! पुण्यश्लोको अहिल्या माता!!
शब्द संकलन : सौ.रेखाताई करंदीकर