वडगाव निंबाळकर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेट्वर्क..
गावातील व्यक्ति मिसिंग असल्याने त्याबाबत दाखल असलेल्या गुन्ह्यात चौकशीसाठी ताब्यात घेतलेले मोबाईल परत देण्यासाठी तब्बल ५० हजारांची लाच मागितल्याप्रकरणी पोलिस नाईक बाळासाहेब पंढरीनाथ पानसरे (वय.४० वर्षे ) याच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी ३२ वर्षीय व्यक्तिने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,तक्रारदाराच्या गावातील व्यक्ती ही मिसींग असल्याने याबाबत वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यासंबंधी चौकशीसाठी बाळासाहेब पानसरे यांनी तक्रारदाराचे दोन्ही मोबाईल फोन ताब्यात घेतले होते,परंतु ते मोबाईल परत करण्यासाठी पानसरे यांनी तक्रारदारांना तब्बल ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केलेली होती.पैसे देणे हे तक्रारदाराला मान्य नसल्याने त्याने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती.१९ मे रोजी या प्रकरणाची लाचलुचपत विभागाकडून पडताळणी करण्यात आली.
पडताळणी अंती त्यात तथ्य असल्याचे समोर आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.अद्याप या प्रकरणात पोलीस नाईक बाळासाहेब पानसरे यांना ताब्यात घेण्यात आले नाही.ते फरार झाल्याची माहिती समोर आली आहे.याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक भारत साळुंखे अधिक तपास करत आहेत.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पुणे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे,अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, पोलीस निरीक्षक भारत साळुंखे, पोलीस कर्मचारी भूषण ठाकूर,महिला पोलीस कर्मचारी पूजा डेरे,चालक पोलीस हवालदार प्रकाश तावरे यांच्या पथकाने केलेली आहे.
बातमी कोट :
शासकिय अधिकारी,कर्मचारी, लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस अधिक्षक राजेश बनसोडे यांनी केले आहे.