इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
इंदापूर तालुक्यातील भारत लाळगे यांची दोन ठिकाणी शेती आहे.एक सरडेवाडी आणि दुसरी सराफवाडीत अशी एकूण २३ एकर शेती आहे. याआधी भारत लाळगे डाळिंब आणि पेरु या पिकाची लागवड करत होते. परंतु लाळगे यांना सलग डाळिंब या पिकात चार वर्ष तोटा सहन करावा लागला.म्हणून २०१९ साली पेरुच्या पिकात त्यांनी पांढऱ्या रंगाच्या जांभळाची आंतरपीक म्हणून लागवड केली.पांढऱ्या रंगाच्या जांभळाचे पीक भारत लाळगे या शेतकऱ्याने घेतले आणि ते यंदा यशस्वी करून दाखवले आहे.या अनोख्या जांभळाला नुकताच पहिला बहर आला असून बाजारात या जांभळाने प्रतिकिलो तीनशे ते चारशे रुपयांपर्यंत भावही खाल्ला आहे.
लाळगे कुटुंबीयांसाठी पुढील १५ वर्षे पांढऱ्या जांभळाची शेती आर्थिकदृष्टय़ा शाश्वत ठरण्याची अपेक्षा आहे. इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी व सराफवाडी येथे लाळगे कुटुंबीयांची साडेतेवीस एकर शेती आहे.नवीन पिकाचा शोध घेत असताना पांढऱ्या रंगाच्या जांभळाची माहिती मिळाल्यानंतर ते चकित झाले. ओडिशामध्ये पांढऱ्या जांभळाची रोपे मिळतात हे समजल्यानंतर त्याचा अभ्यास करून त्यांनी २०१९ साली या प्रजातीची ३०२ रोपे मागविली. शेतात आंतरपीक म्हणून एक एकर क्षेत्रात त्यांनी या पांढऱ्या जांभळाची रोपे लावली.ठिंबक सिंचनावर आणि दोन रोपांमध्ये ठरावीक अंतर ठेवून आणि योग्य निगा राखत ही रोपे वाढविली.
तीन वर्षांनंतर म्हणजे गेल्या एप्रिल महिन्यात झाडांना प्रथमच बहर आला.तयार जांभळे नुकतीच पुण्याच्या गुलटेकडी बाजारात पाठवण्यात आली. प्रतिकिलो तीनशे ते चारशे रुपयांपर्यंत या जांभळांना भाव मिळाल्याने लाळगे कुटुंबीय देखील हरखून गेले आहे. पांढऱ्या रंगाच्या जांभळाचे महत्त्व- आंबट, तुरट, मधुर, रसाळ आणि गरदार अशा या फळामध्ये औषधी गुणधर्म आहेत. विशेषत: मधुमेहींसाठी हे जांभूळ विशेष गुणकारी मानले जाते.कमी पाण्यात आणि कमी खर्चात जांभळाचे पीक घेतलं जातं. सध्या जांभळाची हार्वेस्टिंग सुरु आहे.या जांभूळ पिकामध्ये अ आणि क जीवनसत्त्व असल्याचं तज्ज्ञ सांगतात. तसंच पांढऱ्या रंगाच्या जांभळात विविध औषधी गुण असल्याचे तज्ज्ञांचं म्हणणं आहे.