बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामती येथील जमिनीचा मालक असल्याचे भासवत जमीन नावावर करून देत तब्बल १ कोटी १५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी संशयित आरोपी नरेश दुसेजा असे नाव सांगणाऱ्या व प्रशांत जगताप (रा.पुणे) अशा दोघाजणांवर शहर पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ११४, १२०(बी),४२०,४६४, ४६७,४६८, ४७०,४७१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी किशोर हनुमंत खाडे (रा.रुई,ता.बारामती, जि.पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी खाडे व त्यांच्या कुटुंबाला शेतजमिन विकत घ्यायची होती.जमीन एजंट शहाजी नरुटे (रा. काझड,ता.इंदापूर) यांची फियार्दीशी भेट झाली.नरुटे यांनी लाकडी येथील जमिन गट क्र.९३ मधील ३ हेक्टर ४८ आर जमिन विकायची असल्याचे सांगितले. तसेच (बनावट व्यक्ती) दुसेजा यांच्याशी त्यांचे बोलणे करून दिले.फिर्यादी खाडे यांनी जमिन पाहून व्यवहार ठरवला. या व्यवहारावेळी नरेश गोपीचंद दुसेजा व प्रशांत जगताप हे आले होते. यातील आरोपी दुसेजा याने ही जमीन स्वत:ची आहे,असे सांगत,१ कोटी १५ लाखांना हा व्यवहार ठरल्यानंतर इसारराची रक्कमव देखील देण्यात आली.
यावेळी दुसेजा नावाच्या व्यक्तिने माझा मूळ दस्त हरवला आहे, तो दुय्यम निबंधक कार्यालयातून काढून घेतो असे सांगत इसार पावती केली.त्यापोटी दिलेला १२ लाखांचा चेक नरेश दुसेजा नावाच्या व्यक्तिच्या नावे बारामतीच्या अॅक्सिस बँकेतून वटला.फिर्यादीला दुसेजा नावाच्या व्यक्तिने या जमिनीचा व्यवहार यापूर्वीच संजय ढोले यांना करून दिल्याचे समजले.त्यामुळे फिर्यादींनी त्या व्यक्तिला संपर्क साधला.त्यांनी ढोले यांच्यासह त्यांची भेट घेतली. तुम्हा दोघांपैकी जो कोणी अगोदर खरेदीखत करून घेईल त्याला मी जमिन देणार असल्याचे त्याने सांगितले.फिर्यादी व ढोले हे नातेवाईक असल्याने त्यांनी ढोले यांची इसारपावती रद्द करण्याचा निर्णय घेतला. बनावट व्यक्तींनी जमिनीची मालकी नसतानाही बनावट कागदपत्रे तयार केली.या जमिनीचे शासकिय मूल्य २४ लाख आहे. मात्र, ठरलेल्या १ कोटी १५ लाख रकमेचा दस्त करण्याचे फिर्यादीचे नियोजन होते.
परंतु दुसेजा व जगताप नाव धारण केलेल्या व्यक्तिंनी आम्हाला टॅक्सची अडचण येईल, शासकिय किमतीचाच दस्त करा व उरलेली रक्कम रोख द्या असे सांगितले. त्यानुसार फिर्यादीने नियोजन करीत स्वत:च्या,भावाच्या व मामांच्या नावचे चेक त्यांना दिले.त्यानंतर दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त करण्यात आला.उरलेली ८८ लाख ६५ हजारांची रक्कम त्यांना रोख देण्यात आली. दि. २० मे रोजी बारामतीतील अॅड.भापकर यांनी फिर्यादिला फोन करत तुम्हाला बनावट व्यक्तिने दस्त करून दिल्याचे सांगितले.मूळ मालक नरेश दुसेजा यांची त्यांनी भेट घालून दिली.यावेळी मूळ मालक दुसेजा यांनी फिर्यादीला शेलार यांच्याकडून जमिन घेतल्याची कागदपत्रे तसेच स्वत:चे आधार, पॅनकार्ड दाखवले. फिर्यादीने दस्तावेळी दुसेजा नावाच्या व्यक्तिने दिलेले पॅन,आधार कार्ड पाहिले असता ते बनावट असल्याचे लक्षात आले. बनावट व्यक्तींनी जमिनीची मालकी नसतानाही बनावट कागदपत्रे तयार करत आपली फसवणूक केल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले.