बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामती शहर पोलिस ठाण्यातील हवालदारासह होमगार्ड एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे.एका वाॅरंटमध्ये तक्रारदाराला अटक न करण्यासाठी एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी पोलीस हवालदार अण्णासाहेब नामदेव उगले,वय.४९ वर्षे व होमगार्ड सनी शामराव गाढवे या दोघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस हवालदार उगले यांना अटक करण्यात आली आहे.
तक्रारदाराला लाच देणे मान्य नसल्याने त्याने या दोघांची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. तक्रारीनुसार, वाॅरंटमध्ये अटक न करण्यासाठी होमगार्ड सनी गाढवे याने तक्रारदाराकडे १ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.तडजोडीअंती ८०० रुपये देण्याचे ठरले होते. ५ व ६ मे रोजी एसीबीने या प्रकाराची पडताळणी केली होती. या कामी उगले याने लाच मागणीला प्रोत्साहन दिल्याचे तपासात उघड झाले. त्यानुसार सोमवारी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
बातमी चौकट :
यातील दुसरा संशयित आरोपी सनी गाढवे हा बारामती शहर पोलीस ठाण्यात होमगार्ड या पदावर कार्यरत असून गेल्या काही दिवसांपासून गाढवे हा पोलिसांच्या नावाखाली अनेक लोकांकडून चिरीमिरी घेत असल्याच्या चर्चा देखील सुरू होत्या.यामुळे सनी गाढवे याच्या बाबतीत अनेक नागरिक तक्रारी घेऊन पुढे येण्याची शक्यता आहे.