बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
भारतीय समाज व्यवस्थेचा भक्कम पाया कुटुंबावर आधारित आहे.माता पिता अन् त्यांची संतती भोवतालच नातंसंबंध बळकटीच साधन कुटुंब आहे. माया ममता वात्सल्य स्नेह याची जडणघडण कुटुंबातच होते. संस्कार शिकवणीच विद्यापीठ कुटुंब व्यवस्था आहे. कुटुंब प्रमुख व इतर सदस्य यांच्यातील खेळीमेळीच वातावरण असावे.
संयुक्त कुटुंब हे ख-या अर्थाने जगण्याच व शिकण्याचे महत्त्वाचे अंग आहे. कुटुंब प्रमुखाचे मानाचे स्थान तसेच त्यांची जबाबदारी ,कार्य , लक्ष यातूनच हे वैश्विक नातं तयार होत. मी पणाचा त्याग करुन आपलेपणाच्या उभारणीतील कळसाध्य हे कुटुंब आहे. जगण्यातील मौज , माझं तुझं न करता आपलंच , पडल ते करणं , कुरकुरणं नव्हे तर अंकुरणं हे कुटुंबाच तंत्र होत. भावा भावाचा एकोपा , जावा जावाच समजणं , आजी आजोबांचा सन्मान , चुलते चुलती यांचे आधारस्तंभ , चुलत भावंडे यांचा स्नेहमेळा हाच आनंदसोहळा.
एकाच चुलवणावरील कालवण भाकरीचा आस्वाद , धुणी , भांडी , शेतीवाडी यांचा एकमेकांच्या खांद्यावर धुरा. पेटती चूल , गोठ्यातील देशी गोधनाचा हंबरण , खिल्लारी खोंडाची डरकाळी , कोंबड्या , कुत्री , मांजर यांची दारात हजेरी. अंगणात अगत पंगत. गप्पागोष्टी , मानसन्मान , रुसणं फुगंण अन् लगेच एक होणं. तुळशीच्या भोवती अंगण शेणसडा , सारवणं अन् सावरणं हे कुटुंबाच सत्व तत्व होतं.
भावकीचा हेवादावा यातूनच कुटुंब व्यवस्थेला पहिल्यांदा सुरुंग लागला. मनभेद , मतभिन्नता , मी पणा , हेवेदावे , मत्सर , ईषा यातून कुटुंबव्यवस्था भरडली . आजच्या हम दो हमारे दो , आई बाप फेक दो. यातूनच कुटुंब डबघाईला आले.चला तर कुटुंब व्यवस्थेचा कणा टिकवून ठेऊ या. नव्या पिढीला त्याचे आंतरिक समाधान दाखवूया. एक पाऊलं मागं घेणं. हेच कुटुंब टिकवण्याचे पाउलं अनमोल जपू या. नुसत्या कालवण भाकरीला जी चव होती. ती आजच्या चमचमती जेवणाला उरली नाही. घासातला घास , उष्टं माष्टं , उरल सरलं गुण्यागोविंदाने पुरायचं. आत्ता ओठी पोटी पुरनां अन् तुझं माझं हेच सरनां.
सध्याच्या भूलभूलैय्याच्या जमान्यात पहिल्यांदा कुटुंबाला वेळ देवू. नातंगोतं जपू. पुन्हा एकोप्याची मुठ घट्ट करुन. मानाचं पानं कुटुंबात वाढून घेऊन एकाच ताटात ताठ मानाने तृप्तीची ढेकर देऊन नव्यानं जगणं सुरु करु या.
आपलाच कौटुंबिक प्रा.रवींद्र कोकरे. ( ग्रामीण कथाकार) श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हाय. व ज्युनियर कॉलेज ,फलटण.
९४२१२१६८२१