इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
इंदापूर तालुक्यातील बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणाऱ्या टोळीचा इंदापूर वैद्यकीय पथकाने पोलिसांच्या मदतीने पर्दाफाश केला असून,संशयित आरोपी प्रवीण पोपटराव देशमुख, वय.३२ वर्षे ( रा.राजाळे,ता.फलटण जि.सातारा )तौशिक अहमद शेख, वय.३० वर्षे ( रा. राजाळे,ता.फलटण,जि.सातारा ) यांना गाडीत लिंग निदान करणाऱ्या दोन मशीनसह दोन मोबाईल व इतर वैद्यकीय साहित्य इंदापूर पोलिसांनी जप्त केले असून, आरोपीविरुद्ध पीसीपीएनडीटी कायद्यानुसार कलम २३,२५,२९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी इंदापूरचे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संतोष खामकर यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,वैद्यकीय अधीक्षक डॉ.संतोष खामकर यांना मिळालेल्या माहितीवरून इंदापूरमध्ये एका बलेनो कार गाडीत एम.एच – सी.जी ८०१६ या गाडीमध्ये काही लोक फिरून गर्भवती महिलांची बेकायदेशीरपणे गर्भाचे लिंग निदान करीत असून,वैद्यकीय अधीक्षकांनी तात्काळ इंदापुर पोलिसांच्या मदतीने या संशयित कारचा शोध घेत असता,ही गाडी सुरवड येथील भांडगाव रोडला थांबलेली दिसून आली.त्यावेळी पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली असता,गाडीत दोघेजण एका गर्भवती महिलेचा गर्भ तपासणी करताना आढळून आले.या गाडीतील लिंगनिदान करणाऱ्या मशीन,दोन मोबाईल व इतर साहित्य पोलिसांच्या मदतीने हस्तगत करण्यात आले.
दोघांना ताब्यात घेत सखोल चौकशी केली असता, कोळेगाव तालुक्यातील डॉ.सुशांत हनुमंत मोरे व डॉ.हनुमंत ज्ञानेश्वर मोरे व सौ कमल हनुमंत मोरे यांनी मिळून आतापर्यंत अनेक गर्भवती महिलांचे गर्भाचे लिंग निदान केले आहे.तसेच सध्या तपासणीसाठी आणलेल्या गर्भवती महिलेला त्याच डॉक्टरांनी पाठवलेले आहे.
त्यामुळे या आरोपीविरुद्ध देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही कारवाई जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.माधव कणकवळे,यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.संतोष खामकर, बावडा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे,इंदापूर उपजिल्हा रुग्णालयचे सहा. वैद्यकीय अधीक्षक डॉ.श्रीकृष्ण खरमाटे,डॉ.अमोल खनावरे वैद्यकीय अधिकारी बावडा ग्रामीण रुग्णालय यांनी पोलिसांच्या मदतीने पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,बारामती विभाग पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर प्रभारी पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी,सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, सहाय्यक फौजदार के.बी शिंदे, महिला पोलीस हवालदार खंडागळे,पोलीस नाईक मोहिते, एएचटीयु पथकाचे पोलीस निरीक्षक चव्हाण,महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी देशमुख यांच्या पथकाने केलेली आहे.