पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
महागाईमुळे आज सामान्य जनता त्रस्त झाली आहे. आज लिंबू, कोथिंबीर, आंबा सामान्यांनी खायचा कसा? अशा प्रश्न पडलाय.अर्थमंत्री अजित पवारांनी गॅसवरील टॅक्स कमी करुन एक हजार रुपये माफ केले.तरीही केंद्र सरकार महागाईचे खापर महाराष्ट्र राज्यावर फोडत आहे. मग आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेशमध्ये कुणामुळे महागाई वाढतेय ? आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते कार्टे,असे चालत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलवावी आणि महागाईवर तोडगा काढावा, असे आवाहन खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केले.
शनिपार चौक, पुणे येथे वाढत्या महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने श्री हनुमानाची आरती करून महागाई कमी करण्याचे साकडे घालत अभिनव आंदोलन करण्यात आले. खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या आंदोलनात महागाईची देवी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या ‘कमळाबाई’ ची आरती करण्यात आली.केंद्रात युपीए सरकार असताना स्व.सुषमा स्वराज गॅस सिलिंडर ३५० रुपये झाला म्हणून आंदोलन करत होत्या. त्यांचे त्यावेळचे भाषण आजही माझ्या लक्षात असल्याचे मा. सुप्रियाताई म्हणाल्या. आकडों से पेट नही भरता,जब भूक लगती है, तब धान लगता है.
सुषमाजींचे हेच शब्द वापरुन सुप्रियाताईंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारला.”मोदीजी आम्ही तुमच्यावर नाराज नाही,आम्ही हैराण आहोत.इतकी असंवेदनशीलता कशी दाखवता ? तुमचे सरकार इतके असंवेदनशील कसे? सगळ्या राज्यांना विश्वासात घेऊन चर्चा करा आणि मार्ग काढा”असे त्या म्हणाल्या.ज्या दिवशी महिला लाटणं घेऊन रस्त्यावर येतील तेव्हा केंद्र सरकारला दिल्लीत बसायला जागा राहणार नाही, असा इशारा देताना येणाऱ्या काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महागाईवर राज्यभर आंदोलन करेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
या आंदोलनासाठी पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप,ज्येष्ठ नेते अंकुश काकडे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष श्री विशाल तांबे,निलेश निकम,नगरसेवक प्रदीप गायकवाड, प्रवक्ते प्रदीप देशमुख,महिला अध्यक्षा सौ.मृणालिनी वाणी,युवक शहराध्यक्ष किशोर कांबळे, कार्याध्यक्ष अजिंक्य पालकर,कसबा विधानसभा अध्यक्ष गणेश नलावडे, सौ.रुपाली ठोंबरे पाटील आदींसह मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.