इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
भाजप हा सर्व समाजाला बरोबर घेऊन काम करणारा पक्ष आहे. भाजप मुळे देशातील प्रत्येक समाजाचा विकास झालेला असून,त्यामुळेच प्रत्येक निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळत करीत आहे. भाजप आता ॲक्शन मोड मध्ये असून, स्थानिक स्वराज्य संस्थांसह आगामी येणाऱ्या सर्व निवडणुकांची तयारी भाजपने सुरू केली आहे, असे प्रतिपादन भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना रविवारी केले.इंदापूर येथे राधिका रेसिडेन्शिअल क्लब मध्ये इंदापूर तालुका भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ हर्षवर्धन पाटील यांचे उपस्थित संपन्न झाला.त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
जिल्हा परिषद,पंचायत समिती नगरपालिकांसाठी प्रभाग रचना निवडणूक आयोगाच्या नियमांप्रमाणे व्हावी यासाठी जिल्हाधिकारी,विभागीय आयुक्त यांना आम्ही पत्र दिले आहे. यामध्ये कोणास हस्तक्षेप करता येत नाही जर यामध्ये कोणी हस्तक्षेप केला तर विविध मार्गाने हस्तक्षेपाचा प्रयत्न हाणून पाडला जाईल,असा इशारा हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी बोलताना दिला आहे. भाजपा हा जनहिताची कामे करणारा व तळागाळापर्यंत पोचलेला जगामध्ये व देशामध्येही सर्वात जास्त सदस्य संख्या असणारा पक्ष आहे. इंदापूर तालुक्यात भाजपची गाव तिथे शाखा काढण्यात येणार असून,आगामी काळात भाजप संपर्क अभियान राबविणार आहे,असे हर्षवर्धन पाटील नमूद केले.
ते पुढे म्हणाले,भाजपा हा देशात व राज्यातील नंबर वन पक्ष आहे.आगामी निवडणुकीत भाजप आपली ताकद दाखवून देईल.शेतकरी,मागासवर्गीय,अल्पसंख्यांक, आदिवासी समाजातील उपेक्षित घटक, महिला,युवक वर्ग यांच्यासाठी केंद्रातील भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखाली सरकार अनेक योजना यशस्वीपणे राबवित आहे.देशातील ८२ कोटी जनतेला प्रति महिन्याला मोफत अन्नधान्य पुरवठा करीत आहे.आगामी काळ भाजप साठी भरभराटीचा राहणार आहे. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह हे २८ रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून लवकरच त्यांचा दौरा लवकरच अंतिम होईल असे यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सध्याच्या वीज भारनियमनामुळे शेतकरी व नागरिक त्रस्त आहेत. मात्र महाविकास आघाडी सरकारकडून भारनियमन कमी करण्याचा प्रयत्न केला जात नाही, अशी टीका हर्षवर्धन पाटील यांनी केली.तसेच केंद्र सरकारची पंतप्रधान आवास योजना,हर घर जल योजना, आयुष्यमान योजना आदी अनेक योजनांचा निधी आम्हीच आणल्याचा आव तालुक्याचे लोकप्रतिनिधी सभांमधून दाखवीत आहेत. समाजकल्याण विभाग व दलित वस्ती निधी हा बजेटमधील तरतुदीनुसार येत असतो. तो वेगळा आणावा लागत नाही, असे यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेस नीरा-भीमा कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील,तालुकाध्यक्ष अँड.शरद जामदार, शहराध्यक्ष शकील सय्यद,विलासराव वाघमोडे, बाबा महाराज खारतोडे, युवराज मस्के, अशोक शिंदे, सचिन आरडे उपस्थित होते.
बातमी चौकट :
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ह्या महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणा शिवाय होण्याची शक्यता आहे. आरक्षण मिळण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने दाखवलेल्या नाकर्तेपणाचा यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी तीव्र शब्दात निषेध केला. मात्र भाजप निवडणुकीत ओबीसींना २७ टक्के आरक्षण देईल, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.